मोटारीने धडक दिल्याचा बनाव करून वादावादी करत चौघा भामटय़ांनी तीन लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी चोरून दुचाकीवरून पोबारा केला. गोंधवणी रस्त्यावरील दशमेशनगर चौकात आज दुपारी साडेबारा वाजता हा प्रकार घडला. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विविध बँकांच्या शाखामध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांवर नजर ठेवून नंतर त्यांच्याशी कुरापती काढून त्यांचे पैसे लुबाडण्याचे प्रकार यापूर्वी शहरात अनेकदा घडले आहेत. या टोळीला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
या प्रकरणी अधिक माहिती अशी, तालुक्यातील मातुलठाण येथील प्रकाश भाऊसाहेब वाणी यांनी आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील एचडीएफसी बँकेतून ५० हजार रुपये काढले. अगोदर त्यांनी स्टेट बँकेतून अडीच लाख रुपये काढलेले होते. तीन लाख रुपये एकत्र ठेवून ते स्वत:च्या इंडिका कारमधून गोंधवणीमार्गे कोपरगावकडे निघाले होते. दशमेशनगर चौकात दोघांनी त्यांना मोटारसायकल आडवी लावून धक्का लागल्याचे सांगत वाद घालण्याचा प्रयत्न केला. वाणी त्यांच्याशी बोलत असताना पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी मोटारीत पुढील आसनावर ठेवलेली तीन लाखांची पिशवी पळविली. दोन्ही मोटारसायकलवरून चौघे पुन्हा मागे सय्यदबाबा चौकाकडे पसार झाले. भरदुपारी लूटमारीची ही घटना घडूनही कुणाच्या लक्षात आले नाही. खासगी वाद चालू असतील असे वाटल्याने अनेकांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे लुटारूंचे फावले. वाणी यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील अधिक तपास करीत आहेत.