रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक परिसरातून रासायनिक सांडपाणी गावांमध्ये, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये, शेतीमध्ये तसेच खाडी परिसरात पसरल्याच्या कथित घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित उद्योगांबरोबरच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
यासंदर्भात दलवाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांना सविस्तर निवेदन सादर केले. या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
लोटे औद्योगिक परिसरातील रासायनिक सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याबरोबरच शेती आणि खाडी परिसरातील जैवविविधतेलाही धोका निर्माण झाल्याचा दावा दलवाई यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सर्वंकष चौकशी करून नुकसानाचे मूल्यांकन करण्यात यावे आणि प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या उद्योगांकडून पर्यावरणीय भरपाई वसूल करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
या संवेदनशील पर्यावरणीय प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संबंधित मंत्र्यांची भेट घेण्याची वेळही दलवाई यांनी मागितली आहे. लोटे औद्योगिक परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, सांडपाणी व्यवस्थापनाची काटेकोर अंमलबजावणी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणात राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
