कल्याणकारी योजनांचा सुकाळ होऊनही देशात आजही अज्ञानी, उपाशी, निरक्षर, अर्धपोटी व हक्कवंचितांची संख्या मोठी आहे. महिला व बालकांसाठी कायदे अद्ययावत झाले, मात्र त्यांचे प्रश्न अधिकच गंभीर व जटिल बनताना दिसतात, त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी समाजाला त्यांचे जीवन बदलण्यासाठी संवेदनशील व कृतिशील बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक, मॅगसेस पारितोषिक विजेते डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.
डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे या दाम्पत्याने नगरच्या भेटीत स्नेहालय संस्थेच्या अनामप्रेम तसेच विविध प्रकल्पांना भेटी देत संस्थेतील विद्यार्थी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जगातील सर्वाधिक तरुणाई असलेला भारत देश सामाजिक जाणीव, सेवा व आत्मोद्धाराच्या प्रेरणेने भारलेल्या युवापिढीकडूनच समर्थ व सशक्त बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हेमलकसा व लोकबिरादरी प्रकल्पात येणाऱ्या लोकांची संख्या खूपच वाढली आहे. सेवाकार्याची प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या तरुणाईची संख्याही वाढलेली दिसते, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
स्नेहालयचा अन्यायग्रस्त महिलांचा स्नेहाधार प्रकल्प, एड्सग्रस्त व वेश्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू केलेला हिंमतग्राम प्रकल्प, अंध व अपंगांसाठीचा अनामप्रेम प्रकल्प हे बाबा आमटे यांचे स्वप्न साकारणारे आहेत, असे कौतुकोद्गार डॉ. मंदाकिनी यांनी व्यक्त केले.