रत्नागिरी – कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर कोणतीही प्रक्रीया न करता पावसाचा फायदा घेवून लोटे परशुराम एमआयडीसीमधील जे कारखाने थेट नदीत पाणी सोडून प्रदूषण करत आहेत, अशा कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करावेत अशी सूचना खासदार सुनील तटकरे यांनी केली.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रण समिती (दिशा) समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव आदी उपस्थित होते.
खासदार तटकरे म्हणाले, वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचे लाभ देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या शिबीरांबाबत दिशा समितीच्या सदस्यांना निमंत्रित करुन लाभार्थ्यांची निवड कशा पध्दतीने झाली, याची तालुकानिहाय माहिती द्यावी. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ अधिकाधिक देण्यासाठी महावितरणने गतीने काम करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. कोकण रेल्वेने जिल्ह्यातील रेल्वे प्लॅटफार्मची उंची वाढवावी. त्याचबरोबर भरती प्रक्रियेमध्ये प्रकल्पग्रस्तांमधून भरती करण्याला प्राधान्य द्यावे. खनिकर्मच्या निधीचे ७ भागांमध्ये वाटप करावे. जलजीवन मिशनमध्ये पूर्ण झालेल्या आणि अपूर्ण राहिलेल्या योजनांची तालुकानिहाय यादी द्यावी, असे ही सांगितले. ज्या ठिकाणी जलजीवन मिशनचे काम पूर्ण झाले असेल त्याठिकाणी टँकर सुरु असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची पडताळणी करुन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या सुचना तटकरे यांनी केल्या.
कोकाकोला कंपनीच्या विरोधात मुकमोर्चा काढणाऱ्या ४०० लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत एसपींनी तात्काळ अहवाल द्यावा. चुकीचे झाले असेल तर हा विषय संपवावा. माझ्या मतदार संघात अशी चुकीची कारवाई खपवून घेणार नाही. कोकाकोला कंपनींने स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.