नगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या आंदोलनानंतर नगर शहरात आज, बुधवारी पहाटे प्रार्थनास्थळावरील ध्वनिवर्धक (भोंगे) बंद ठेवून अजान देण्यात आली. शिर्डीतील साईबाबा देवस्थान समितीने शेजारती व काकड आरती पोलिसांकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार बंद ठेवण्याचा तसेच शनी शिंगणापूर देवस्थाननेही ध्वनिवर्धकावरील काकड आरती बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांच्या पत्रानंतर घेतला. दरम्यान, श्रीरामपूरमध्ये मशिदीसमोर सामुदायिक हनुमान चालीसा पठण करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सुमारे ९५० समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मनसेच्या भूमिकेनंतर जिल्ह्यातील सुमारे १५० धार्मिकस्थळांनी ध्वनिवर्धकासाठी पोलिसांकडे अर्ज केले आहेत. प्रत्यक्षात २ हजारांवर स्थळांवर ध्वनिवर्धक असल्याचे पोलिसांना आढळले आहे. बुधवारपासून मशिदीवरील भोंगे चालू ठेवल्यास त्यापुढे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा म्हणण्याची भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर नगर शहर पोलीस विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे, तोफखान्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे साहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी शहरातील मशिदीचे मौलवी व विश्वस्त मंडळाची बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली. रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान ध्वनिवर्धक लावता येणार नाही, याची कल्पना देण्यात आली. त्याला मशिदींच्या व्यवस्थापनांनी सहकार्य केले. यासाठी पोलिसांनी नगर शहरात पहाटे ३ वाजल्यापासूनच गस्त सुरू केली होती. मात्र बहुसंख्य मशीदींवरील ध्वनिवर्धक वाजले नाहीत. काही अपवादात्मक ठिकाणी ध्वनिवर्धक वाजल्याचा माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित विश्वस्तांना समज दिली. आज दिवसभर पोलिसांची शहरात गस्त सुरू होती. पोलिसांनी मनसे पदाधिकारी सचिन डफळ, नितीन भुतारे, गजेंद्र राशिनकर, विनोद काकडे, गणेश शिंदे, संतोष साळवे, संकेत व्यवहारे, अॅवड. अनिता दिघे, सुमित वर्मा, मनोज राऊत आदी पदाधिकाऱ्यांना काल रात्रीच प्रतिबंधात्मक नोटिस बजावल्या होत्या. दरम्यान अॅाड. दिघे यांनी जुन्या कोर्टामागे हनुमान चालीसा पठण करण्यासाठी तसेच नितीन भुतारे यांनी माळीवाडा मारुती मंदिराजवळ हनुमान चालीसा पठणासाठी परवानगी मागणारा अर्ज कोतवाली पोलिसांना दिला. ही परवानगी पोलिसांनी नाकारल्याचे समजले.
साईबाबा देवस्थानकडून न्यायालयाच्या आदेशाचे पालन
जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्री साईबाबांच्या मंदिरावरील वर्षांनुवर्ष सुरू असलेली रात्रीची शेजारती तसेच पहाटेची काकड आरती पोलिस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार ध्वनिवर्धकावरून बंद करण्यात आल्याची माहिती संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. आता साई मंदिरावरील दैनंदिन ४ पैकी २ आरत्या ध्वनिवर्धकावर तर दोन विनाध्वनिवर्धक होणार आहेत. जिल्हा पोलिसांकडून प्राप्त झालेल्या पत्रात न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे. संस्थानच्या प्रथा, परंपरा यांना कुठेही मुरड न घालता न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले जाणार असल्याचे श्रीमती बागायत यांनी सांगितले. दरम्यान, शिर्डी शहर जामा मशीद ट्रस्टचे सचिव बाबाभाई सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसाच्या अजान ध्वनिवर्धकावर मर्यादा पाळून तर पहाटेची अजान ध्वनिवर्धकावर बंद करण्यात आली आहे. यापुढेही सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आम्ही निर्णय घेऊ. शिर्डीतील सर्व सहा मशिदींमध्ये भोंग्यांसाठी पोलिसांकडे परवानगी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीरामपूरमध्ये २८ कार्यकर्त्यांना अटक
श्रीरामपूरमधील सय्यदबाबा चौकातील मशिदीसमोर, छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामुदायिक हनुमान चालीसा पठण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. मनसेचे पदाधिकारी बाबा शिंदे, सुरेश जगताप, संतोष डहाळे, नीलेश लांबोळे, गणेश दिवसे, विकी राऊत, विशाल लोंढे, डॉ. संजय नवथर, सागर बोंडगे, संतोष भालेराव, समर्थ सोनार, दीपक सोनवणे, नीलेश सोनवणे, मिच्छद्र हिमगिरे, राहुल शिंदे, किशोर शिंदे, रतन वर्मा, विकास शिंदे, मिच्छद्र शिंदे, शुभम शिंदे, मंगेश जाधव, अक्षय अभंग, रोहन गायकवाड, सागर गायकवाड, प्रवीण कारले, विक्रांत लोखंडे, लक्ष्मण शिंदे आदींना अटक करण्यात आली. बाबा शिंदे यांचे नेतृत्वाखाली राम मंदिरात दर्शन घेऊन मनसे कार्यकर्ते मोठय़ा आवाजात हनुमान चालीसा पठण करण्यासाठी निघाले. राम मंदिर चौकात पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या फौजफाटय़ाने त्यांना अडवले. कार्यकर्त्यांनी या वेळी जोरदार घोषणाबाजी करत ध्वनिवर्धक लावून सामुदायिक हनुमान चालीसा पठण सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली.

२ हजार विनापरवाना; ६ अर्जाना परवानगी
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात विविध धर्मीयांची सुमारे ४ हजारांवर धार्मिक स्थळे आहेत. त्यातील २ हजारांवर धार्मिक स्थळांवर ध्वनिवर्धक बसविण्यात आले आहे, मात्र कोणीही परवानगी घेतलेली नाही. आता जिल्ह्यात ध्वनिवर्धकासाठी परवानगी मागणारे १५० अर्ज आले आहेत. त्यातील ६ अर्जाना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाभरातील ९५० समाजकंटकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिस बजावल्या आहेत.