आधी नितीश कुमारांना बिहारमध्ये लव जिहादचा कायदा करू द्या; संजय राऊतांचं भाजपाला आव्हान

“जसं काही हे करोनाचेच बाप आहेत”

संग्रहित छायाचित्र (PTI)

गेल्या काही दिवसांपासून देशात लव जिहाद प्रकरण चर्चेत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये लव जिहाद विरोधात कायदा केला जाणार असल्याची चर्चा असून, महाराष्ट्रातही हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात लव जिहादच्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. भाजपाच्या मागणीला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर देत आव्हान दिलं आहे.

“विकास हाच निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा असतो. पण, लव जिहादचा मुद्दा समोर आला आहे. त्याचं स्वागत करतो. महाराष्ट्रात कायदा कधी होणार असं काही नेते म्हणत आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात कायदा केला जाणार आहे. राज्यातील काही भाजपाचे जे प्रमुख नेते विचारत आहेत की, महाराष्ट्रात कायदा कधी होणार? माझी आज सकाळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. या विषयावर आम्ही इतकं सांगू की, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कायदा होऊ द्या. पण, बिहारमध्ये नितीश कुमार जेव्हा लव जिहादचा कायदा आणतील. त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू. त्यानंतर महाराष्ट्रात कायदा आणण्याविषयी विचार करू. बिहारमध्ये भाजपाचं सरकार आहे. नितीश कुमार भाजपाचेच मुख्यमंत्री आहेत. कारण सर्वात जास्त जागा भाजपाच्या आहेत. नितीश कुमार तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचाच आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

आणखी वाचा- फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधी वर्षपूर्तीवर संजय राऊतांचा टोला; म्हणाले…

“गेल्या काही दिवसांपासून देशात आणि महाराष्ट्रात लव्ह जिहाद विषयावर महाराष्ट्रातला विरोधी पक्ष, तसंच देशात जिथे भाजपाची सत्ता नाही तिथे लव्ह जिहादसंबंधी कायदा करा अशी मागणी होत आहे. बहुधा पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी हे होत आहे. मी यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात कायदा होतोय. महाराष्ट्रात करा असा हट्ट केला जात आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचं राहू दे…बिहारमध्ये नितीश कुमार जवळजवळ भाजपाचेच मुख्यमंत्री आहेत. बिहारमध्ये सर्वात आधी कायदा करा. तिथे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जो कायदा बनवला जाईल त्याचा अभ्यास करु आणि नंतर महाराष्ट्रात विचार करु. राज्यात लव्ह जिहाद नव्हे, तर करोनाचं संकट मोठं आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- शरद पवारांना छोटे नेते म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांनी फटकारलं; म्हणाले…

“अर्थव्यवस्था सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बेरोजगारी, महागाई या मुद्यांपेक्षा मोठा लव जिहाद असेल, तर आधी बिहारमध्ये कायदा होऊ द्या. अभ्यास करून महाराष्ट्रात कायदा करण्याचा विचार करू. पंतप्रधानांचं म्हणणं भाजपा नेत्यांना समजत नाहीये. दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयंकर संकट असल्याचं पंतप्रधान सांगत आहेत. पण, महाराष्ट्रात भाजपाचेच नेते पंतप्रधानांचंच ऐकत नाहीयेत. उलट आंदोलन करत आहेत. रस्त्यावर उतरत आहे, जसं काही हे करोनाचेच बाप आहेत,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Love jihaad law maharashtra govt sanjay raut nitish kumar devendra fadnavis maharashtra bjp leader bmh