चार दिवस पावसाचे ; मोठय़ा प्रतीक्षेनंतर अवतरलेल्या थंडीची हुलकावणी

कमी दाबाचे क्षेत्र अंदमान समुद्राच्या मध्यावर असून, ते दक्षिण-पूर्व दिशेने पुढे जात आहे.

पुणे : समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागांत पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रतीक्षेनंतर काही दिवसच अवतरलेली थंडी गायब झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात गेल्या आठवडय़ात कोरडय़ा हवामानाची स्थिती होती. त्याचबरोबर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाहही सुरू झाले होते. त्यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत कमी झाले होते. परिणामी काही भागांत रात्री गारवा निर्माण झाला होता. दिवसाचे कमाल तापमानही सरासरीच्या खाली आल्याने उन्हाचा चटकाही कमी होता. थंडी सुरू झाली असे वाटत असतानाच दक्षिणेकडे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले. तिथे जोरदार पाऊस झाला. पाठोपाठ अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्याचा परिणाम राज्यावर झाला असून, पावसाळी वातावरणामुळे रात्रीच्या तापमानात एकदमच वाढ झाली आहे. सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी खाली आलेले किमान तापमान सध्या सर्वच ठिकाणी सरासरीपेक्षा २ ते ७ अंशांनी वाढले आहे.

कमी दाबाचे क्षेत्र अंदमान समुद्राच्या मध्यावर असून, ते दक्षिण-पूर्व दिशेने पुढे जात आहे. दक्षिणेकडील राज्यांत पुन्हा जोरदार पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र

सध्या अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. मात्र, आता अरबी समुद्रातही नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. पूर्व-मध्य अरबी समुद्रात १७ नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, ते महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीजवळ असणार आहे. त्याचाही परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे.

पाऊस कुठे?

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात १६ नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर जिल्ह्यांतही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मराठवाडय़ातील बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Low pressure area in sea caused rainfall conditions in various parts of maharashtra zws

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या