scorecardresearch

नगरमध्ये निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

भाजपची सध्याची वाटचाल पाहता त्यांनी दिलेली ग्वाही कितपत खरी ठरते असाही प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.

bjp flag
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

मोहनीराज लहाडे

नगर : भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी नगरच्या दौऱ्यात, नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार आयात केला जाणार नाही, अशी ग्वाही देत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या अस्वस्थतेनंतरच त्यांना ही ग्वाही देणे भाग पडले आहे. भाजपची सध्याची वाटचाल पाहता त्यांनी दिलेली ग्वाही कितपत खरी ठरते असाही प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.

भाजप कार्यकर्त्यांनी अशाच भावना यापूर्वी प्रदेशाध्यक्ष आणि त्यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्षांकडेही व्यक्त केल्या होत्या. २०१४ आणि त्यानंतर इतर पक्षांकडून भाजपमध्ये देश आणि राज्य पातळीवर सुरू झालेल्या लोंढय़ातून निष्ठावान भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याचेच हे प्रतिबिंब नगरमध्ये उमटले आहे. त्याला कारणही तसेच घडत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, काँग्रेसमधून ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे, त्यांचे चिरंजीव सुजय विखे, जिल्ह्यातील अशा अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपले बस्तान बसवले. काँग्रेसमधून बाहेर ढकलले गेलेले, नाशिक पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी स्वत:ला अपक्ष म्हणून जाहीर केले असले तरी भाजपच्या पाठिंब्यावर ते विजयी झाल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे मानले जाते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भाचे आमदार तांबे यांच्या भूमिकेबद्दल मौन बाळगत भाजपला अनुकूलता प्राप्त करून दिली.

भाजप खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांच्यामध्ये निर्माण झालेली राजकीय सलगी भाजप कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे. नगर शहरात अनेकदा विकासकामांच्या कार्यक्रमात खासदार विखे यांच्यासमवेत भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी अनुपस्थितीत असतात मात्र राष्ट्रवादीचे आमदार जगताप हमखास उपस्थित असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील संघटनाच्या दडपणातून काही दिवसांपूर्वी खासदार विखे यांना ‘लव्ह जिहाद’, धर्मातर यासारख्या वादग्रस्त विषयाची पाठराखण करणे भाग पडले. अनेक दिवस या वादग्रस्त विषयापासून स्वत:ला दूर ठेवले होते.

आता भाजप खासदार विखे यांच्याशी राजकीय मैत्र जपणारे राष्ट्रवादीचे आमदार जगताप हे अलीकडच्या काळात रा. स्व. संघ परिवारातील हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक हजेरी लावताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी विश्व हिंदू परिषदेला देणगी दिली. या संघटनांनी आयोजित केलेल्या हिंदू धर्मसभा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्रावरील कार्यक्रमांना असलेली त्यांची उपस्थिती यामुळे आमदार जगताप यांच्या पुढील राजकीय वाटचालीची चर्चा होऊ लागली आहे. भाजपच्या विशेषत: नगर शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ होण्यामागील हेच तर प्रमुख कारण आहे. स्वत: आमदार जगताप याबद्दल कोणतीही वाच्यता करत नाहीत. मात्र संघ परिवारातील हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमांना त्यांची असणारी उपस्थिती त्यांच्या वाटचालीची दिशा दाखवतात. मात्र इतर पक्षांतील नेत्यांच्या प्रवेशावेळी प्रदेश व देश पातळीवरील नेत्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फारसे विचारात घेतले नव्हते. किंबहुना विरोध डावलूनच विखे, पिचड यांना प्रवेश दिला गेला होता.

आता तर भाजपश्रेष्ठीकडून मंत्री राधाकृष्ण विखे यांना विशेष पाठबळ दिले जात आहे. अर्थात जिल्ह्यातील ज्या नेत्यांना भाजपने पक्षप्रवेश दिला, त्या बहुसंख्य मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे सक्षम उमेदवारही नव्हता की तेथे यापूर्वी कधी पक्षाला संधी मिळालेली नाही. त्यामुळे या नेत्यांच्या पक्षप्रवेशाने भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये फारशी अस्वस्थता निर्माण झाली नव्हती. परंतु नगर शहरात मात्र याची चाहूल लागताच त्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्याने प्रदेश महामंत्र्यांवर ग्वाही देण्याची वेळ आली. अर्थात जिल्ह्यातील इतर ठिकाणाप्रमाणेच नगर शहर विधानसभा मतदारसंघातदेखील भाजपला कधी संधी मिळालेली नाही आणि महापालिकेतही कधी भाजप स्वबळावर सत्ता प्राप्त करू शकलेला नाही. भाजपला अनुकूलता लाभूनही युतीच्या दीर्घ वाटचालीत नगर शहरावर तत्कालीन शिवसेनेचेच वर्चस्व राहिले. त्यातून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोठी कुचंबणा झाली. आता पक्षाच्या माध्यमातून विधानसभेसाठी उमेदवारीची संधी मिळेल, याच्या प्रतीक्षेत शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी शहराध्यक्ष वसंत लोढा असे अनेक जण आहेत. इच्छुकांच्या भाऊगर्दीतून ही अस्वस्थता पुढे आणली गेली आहे.

नेतृत्वाचा अभाव?

अडीच वर्षांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत भाजपने नगरचे महापौरपद पटकावले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही नगरचे महापौरपद शिवसेनेकडे जायला नको या स्थानिक राजकारणातून आमदार जगताप यांनी पाठिंबा देत अल्प संख्याबळ असणाऱ्या भाजपला महापौरपद बहाल केले. त्या वेळी कोणत्याही भाजप पदाधिकाऱ्यांकडून अशी अस्वस्थता व्यक्त झाली नव्हती. त्या वेळी शहरात माजी खासदार दिलीप गांधी यांचे नेतृत्व होते आणि भाजपमधील बहुसंख्यांना त्यांनी घेतलेला निर्णय मान्य होता. आता शहर भाजपमध्ये एकमुखी नेतृत्वाचा अभाव निर्माण झाला आहे. इच्छुक नेत्यांची संख्याही अधिक झाली आहे. त्यातून ग्वाही देण्याचा प्रसंग निर्माण झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 00:02 IST
ताज्या बातम्या