अन्यायावर लाथ मारा हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच. ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण हे आपलं ब्रीद आहेच. आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी हीच शिकवण दिली आहे. ही शिकवण मानणारे अस्सल आणि कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. विकाऊ होते ते विकले गेले. काय भाव ते तुम्हाला माहित आहे. असं उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात म्हणतात उपस्थितांनी ५० खोके एकदम ओके या घोषणा दिल्या. त्यानंतर ही घोषणा राहुल गांधींपर्यंत जम्मूलाही पोहचली आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ठाण्यात आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबीरात उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी छोटेखानी भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले जे अस्सल शिवसैनिक निखाऱ्यासारखे माझ्यासोबत राहिले आहेत हे निखारेच उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत असं म्हणत ठाण्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्यांना टोला लगावला आहे. तसंच महाराष्ट्रात जे काही घडलं त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर मी लवकरच ठाण्यात सभा घेणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.

आनंद दिघे यांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून हार अर्पण

उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या टेंभी नाका भागात जाऊन आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे. ही घटना महत्त्वाची मानली जाते आहे. आनंद आश्रम या ठिकाणी ते गेलेले नाहीत. आनंद दिघे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरु मानतात. अशात याच ठाण्यात जाऊन उद्ध ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि हार घातला. आज उद्धव ठाकरेंच्या सोबत राजन विचारे तर होतेच पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही आहेत.

शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे ठाण्यात

शिवसेनेत जून महिन्यात जी भली मोठी फूट पडली त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले. ठाण्यात त्या निमित्ताने कडेकोट बंदोबस्त पाहण्यास मिळाला. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. आनंद आश्रम या ठिकाणीही उद्धव ठाकरे जाणार अशी चर्चा होती. मात्र त्या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालय असा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे तिथे गेले नाहीत अशी चर्चा ठाण्यात रंगली होती.

ठाण्यातल्या सभेची चर्चा

उद्धव ठाकरे यांनी आजच आपण ठाण्यात लवकर सभा घेणार असून सगळ्या गोष्टींना उत्तरं देणार असल्याचं म्हटलं आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे सभा कधी घेणार आणि नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण उद्धव ठाकरे हे सभा घेताना एकनाथ शिंदे यांचा समाचार घेणार हे नक्की आहे. शिवसेनेत जे काही घडलं त्यामुळे देशभरात महाराष्ट्राची बदनामी झाली असंही उद्धव ठाकरेंनी भाषणात सांगितलं. तसंच ५० खोके एकदम ओके ही घोषणा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही पोहचली आहे त्याबद्दल आपल्याला संजय राऊत यांनी सांगितलं असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loyal shiv sainiks were with me you know the value of those who were sold says uddhav thackeray scj
First published on: 26-01-2023 at 13:49 IST