वेंगुर्ले नगर परिषदेने प्लास्टिकचा रस्ता बनविला

टाकाऊ कचऱ्यातील प्लास्टिकच्या पिशव्यांचा तसेच तत्सम इतर प्लास्टिक घटकांचा वापर करून वेंगुर्ले नगर परिषदेने वेंगुर्ले शहरात २०० मीटर लांबीचा मजबूत व टिकाऊ रस्ता तयार केला आहे.

टाकाऊ कचऱ्यातील प्लास्टिकच्या पिशव्यांचा तसेच तत्सम इतर प्लास्टिक घटकांचा वापर करून वेंगुर्ले नगर परिषदेने वेंगुर्ले शहरात २०० मीटर लांबीचा मजबूत व टिकाऊ रस्ता तयार केला आहे. अशा प्रकारे प्लास्टिकमिश्रित घटकांनी डांबरीकरण केलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच रस्ता आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वेंगुर्ले नगर परिषदेने हा उपक्रम राबविला आहे.
कचरा डम्पिंग ग्राऊंडवर वेंगुर्ले शहरातून चतु:सूत्री पद्धतीने ओला, सुका, प्लास्टिक तसेच काच व धातू या स्वरूपात कचरा संकलित केला जातो. त्यानुसार संकलित झालेला प्लास्टिकचा कचरा हा क्रेशर मशीनमध्ये टाकून तो बारीक केला जातो. हा बारीक झालेला प्लास्टिकचा भुसा नंतर रस्ता तयार करण्याकरिता गरम करण्यात आलेल्या डांबरामध्ये १२० ते १६० डिग्री तापमानाला वितळविला जातो.
तयार झालेले हे मिश्रण रस्ता तयार करण्याकरिता वापरले जाते. डांबरामध्ये प्लास्टिक अशा मिश्रणातून तयार करण्यात आलेला रस्ता हा टिकाऊ, मजबूत तसेच अधिक वर्ष वापरण्यास योग्य राहतो, असे नगर परिषद मुख्याधिकारी रामदास कोकरे म्हणाले.
भारतात अशा प्रकारचा प्रयोग बंगलोर महापालिकेने केला असून तो यशस्वी झाला आहे. महाराष्ट्रात हा प्रयोग प्रथमच वेंगुर्ले नगर परिषदेने केला आहे. प्लास्टिकमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या निर्मूलनासाठी हा उत्तम फायदेशीर पर्याय असल्याचे कोकरे म्हणाले.
लोकसहभाग, प्रशासन व व्यवस्थापनामुळे वेंगुर्ले नगर परिषद प्लॅस्टिकमुक्त बनली आहे. ही नगर परिषद कचरामुक्तही ठरली आहे. दररोज संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती, बायोगॅस, ब्रिकेट त्याचबरोबर कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वेंगुर्ले शहरात अंदाजे सहा एकर जागेत कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे, असे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले.
या प्रकल्पात दररोज दीड ते दोन टन ओला कचरा, साडेचार ते पाच टन सुका कचरा, तसेच ५० किलो प्लास्टिक कचरा संकलित केला जातो. ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती, बायोगॅस आणि सुक्या कचऱ्यापासून इंधनासाठी उपयुक्त असणारे ब्रिकेट्स बनविले जाते.
त्याचबरोबर संकलित झालेला काचेच्या व धातूच्या बाटल्या रिसायकलिंगसाठी देण्यात येतात. या विक्रीपासून उपलब्ध झालेला निधी हा पुन्हा याच प्रकल्पाच्या आवश्यक खर्चासाठी वापरला जातो, असे मुख्याधिकारी रामदास कोकरे म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Made plastic road in vengurla

ताज्या बातम्या