सांगली जिल्ह्याचे वैभव आणि दुष्काळी पूर्व भागाला वरदान ठरलेली माडग्याळ मेंढी ( Madgyal Sheep) आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कुतूहलाचा आणि अभिमानाचा विषय ठरली आहे. दिसायला अत्यंत देखणी, उंचीला माफक, शारीरिक आकाराने वेगळी असणाऱ्या मेंढीला आता राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळाली आहे. पण, केवळ ओळख मिळून, जतन, संवर्धन होणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारने त्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.
माडग्याळी मेंढीला ऑगस्ट २०२६ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अंतर्गत ‘स्वतंत्र देशी जात’ म्हणून अधिकृत राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. आपल्या वेगवान वजन वाढीच्या क्षमतेमुळे ही जात पशुपालकांमध्ये अतिशय फायदेशीर मानली जाते.
सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग कायमस्वरुपी दुष्काळी म्हणून प्रसिद्ध आहे. अलिकडे म्हैसाळ, टेंभू – ताकारी योजनेमुळे दुष्काळी भागात पाणी पोहचले असले तरीही दुष्काळच्या खुणा कायम आहेत. अशाच दुष्काळी जत तालुक्यातील माडग्याळ या लहान गावातील मेंढी पालन करणाऱ्या धनगर आणि रामोशी समाजातील पशुपालकांनी अत्यंत योजनपूर्वक निवड पद्धतीने ही प्रजात विकसित केली आहे. वेगाने होणारी वजन वाढ आणि मांसासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या मेंढीची पैदास सध्या जत तालुक्यातील माडग्याळ, सनमडी गावासह आटपाडी, कवठे महांकाळ, खानापूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात माडग्याळी मेंढीची पैदास दिसून येते. अलिकडे राज्याच्या अन्य जिल्ह्यांतील मेंढपाळांची पसंती या मेंढीला असल्याचे दिसून येत आहे. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात या मेंढीच्या खरेदीसाठी सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या पशु बाजारात येताना दिसत आहेत.

माडग्याळी मेंढीचे वैशिष्ट काय ?
माडग्याळी मेंढी पांढर्या रंगाची असते, त्यावर तपकिरी ठिपके असतात. काही वेळा पूर्ण तपकिरी रंगाच्या मेंढ्याही असतात. या मेंढीचा आकार अन्य मेंढ्याच्या तुलनेत मोठा असतो. नाक बाकदार असते. विशिष्ट पद्धतीच्या नाकामुळे पशुपालकांच्या नजरेत भरते. या मेंढीची लोकर अत्यंत खडबडीत व केसाळ असते. कपाळ रुंद व फुगीर असते. पाय लांब आणि मजबूत असतात. खुरे राखाडी आणि कणखर असतात. नर व मादीला शिंगे नसतात. कास गोल व सड टोकदार असतात. कान मोठे, लांब व लोंबकळणारे असतात.
या मेंढीची वाढ वेगाने होते, वजन वाढ वेगाने होते, त्यातून मिळणारे मांस उत्पादनही चांगले असते. जुळी कोकरे देण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. कोकरांची वर्षभरामध्ये २५ किलोपर्यंत वाढ होते. वयात आलेला नराचे वजन ६० किलोपर्यंत तर मादीचे वजन ४५ किलोपर्यंत वाढते. अत्यंत कमी खर्चात होणारी पैदास आणि जास्तीत जास्त नफा मिळवून देणारी ही जात सांगलीच्या पूर्व भागात चांगलीच प्रसिद्धीस आली आहे. कमी खर्चातील पैदाशीमुळे पशुपालकांसाठी वरदान ठरलेल्या या माडग्याळी मेंढीत बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची चांगली क्षमता आहे. या मेंढीला आणि कोकरांना बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे या मेंढ्या आर्थिक उत्पन्नाचा मोठा आधार बनल्या आहेत.

माडग्याळी मेंढीची राज्यातील संख्या लाखांवर
माडग्याळी मेंढीची राज्यातील संख्या लाखाच्या घरात आहे. आजवर सर्वसामान्य पशुपालकांनी पैदास केली आहे. याचे पुढचे पाऊल म्हणून काही मेंढपाळांनी एकत्र येऊन राजमाता माडग्याळ शीप ब्रीडर्स असोसिएशन स्थापन केली आहे. या माध्यमातून माडग्याळी मेंढीची पैदास होत असली तरीही आता शास्त्रीय मदतीची गरज आहे. नॅशनल ब्युरो ऑफ निमल जेनेटिक रिसोर्सेस, कर्नाळ हरियाना (एनबीएजीआर) या संस्थेने आता मानांकन दिले आहे. आता केवळ मानांकनावर थांबून चालणार नाही, सर्वसमावेशक पैदास धोरणाची गरज आहे. पुन्हा पैदाशीची जबाबदारी कोणत्याही संस्थेवर टाकून चालणार नाही. कोणत्याही संस्थेत पैदास होण्याऐवजी सामान्य पशूपालकांच्या कळपातच संवर्धन होणे कधीही चांगले. त्या शिवाय माडग्याळी मेंढी सर्वसामान्य मेंढपाळाच्या घरात पोहचणार नाही. फक्त केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरघोष आर्थिक तरतूद करण्याची गरज आहे.
पैदास क्षेत्र अडचणीत
माडग्याळी मेंढीची पैदास क्षेत्र सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग आहे. हा भाग तसा दुष्काळी. सध्या या भागात सिंचन योजनांचे पाणी गेले आहे. डोगराळ माळरांनावर डाळिंब, पेरूच्या बागा फुलल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले आहेत. पण, याचा तोटा माडग्याळी मेंढ्यांना बसत आहे. चरण्यासाठी कुरणे राहिली नाहीत. गायरानांवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे पैदास क्षेत्रातील चराऊ कुरणांचा ऱ्हास झाला आहे. त्यामुळे माडग्याळी मेंढीचे मूळ पैदास क्षेत्रच धोक्यात आला आहे. सरकारने तातडीने हे पैदास क्षेत्र संरक्षित करण्याची गरज आहे. अन्यथा एकीकडे राष्ट्रीय मानांकन मिळाले म्हणून आंनद साजरा केला जात असतानाच गवताळ कुरणांच्या अभावी मूळ पैदास क्षेत्रातच मेंढ्यांची संख्या घटत असल्याची स्थिती समोर येण्यास वेळ लागणार नाही.
dattatray.jadhav@expressindia.com
