अहिल्यानगर:‌ महाराष्ट्रासह परराज्यातील अठरापगड जातीतील भाविकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेसाठी सुमारे पाच लाखांवर भाविकांनी कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. कानिफनाथांचा जयजयकार, डफांच्या आवाजाने‌ परिसर दुमदुमून गेला होता. दोन हजारावर काठ्या कानिफनाथांच्या कळसाला टेकवल्या गेल्या.

मढी यात्रा होळी, रंगपंचमी व फुलोरबाग, अशा तीन टप्प्यांत भरते. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतल्याने मढी यात्रेचा मुख्य दिवस मानला जातो. महाराष्ट्रासह गुजरात,कर्नाटक,आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश येथूनही नाथभक्त मढीत दाखल झाले होते. शेकडोंच्या संख्येने भाविक देवांच्या काठ्या घेऊन आले होते.‌ मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून धार्मिक विधी केला जातो.‌

देवस्थान समितीने अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, माधुरी मरकड, अनिल साठे, दादासाहेब मरकड, महादेव कोकाटे, उत्तम मरकड, अँड. तानाजी धसाळ, तानाजी शिंदे, मदन मरकड, उषा मरकड या विश्वस्तांसह मुख्य कार्यकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड यांनी भाविकांचे स्वागत केले.

भक्त नाथांच्या समाधीला गलफ (वस्त्र), पुष्पहार, दवना, सुगंधी अत्तर, रेवडी आणि मलिद्याचा प्रसाद अर्पण करतात.‌ मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने यंदा पाण्याची टंचाई जाणवली नाही. पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था देवस्थान समितीकडून करण्यात आली होती. नाथांचा प्रसाद म्हणून भाविक रेवड्या नाथांच्या समाधीला वाहत होते. त्यामुळे रेवड्यांच्या बाजारात मोठी उलाढाल झाली. यात्रेनिमित्त कानिफनाथांच्या मुख्य गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता.

जिल्ह्यातील सर्वच आगारांतून मढीला जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. मढीकडे येणारे सर्व रस्ते सकाळपासूनच गर्दीने फुलून गेले होते. निवडुंगे ते मढी व मढी ते पाथर्डी या रस्त्यावर काहीकाळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मंदिरापासून सुमारे १ किमी. लांब मोठ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था चारही बाजूंनी करण्यात आली होती. पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. तरीही खिसेकापूंचा सुळसुळाट पाहायला मिळाला. अनेक भाविक पोलिसांकडे तक्रारी दाखल न करताच निघून गेले.

रेवड्यांची उधळण

साधारण २ हजार नाथभक्तांची मंडळे व भाविकांनी शनिवारी रात्रीपासूनच काठ्यांची मिरवणुका सुरू केल्या होत्या. रंगपंचमीच्या दिवशी नाथसिद्धांचे आखाडे, विविध ठिकाणाहून आलेल्या मानाच्या काठ्या वाजत- गाजत नाथांच्या मंदिराच्या कळसाला लावण्यात येतात. भाविकांकडून मंदिरावर रेवड्यांची उधळण केली जाते.