प्रसिद्ध लेखक व अभिनेते मधुकर तोरडमल, रंगकर्मी प्रशांत दामले आणि नेताजी (दादा) भोईर यांना अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
दर दोन वर्षांनी नाटय़ परिषदेच्या शाखेतर्फे हे पुरस्कार देण्यात येतात. तोरडमल यांना वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार, तर दामले यांची वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यंदापासून नाशिकच्या रंगभूमीसाठी कार्यरत रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक किंवा तंत्रज्ञ यांना बाबूराव सावंत पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, पहिला पुरस्कार नेताजी भोईर यांना देण्यात येणार आहे.
नेताजींनी नाटय़ परिषद शाखेचे अध्यक्षपद सांभाळण्याबरोबरच लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, संगीतकार, नेपथ्यकार, रंगभूषाकार अशा विविध बाजूही सांभाळल्या आहेत. शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी या पुरस्कारांसाठी समिती नेमली होती. या समितीत प्रा. रवींद्र कदम, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, रवींद्र ढवळे यांचा समावेश होता.
फेब्रुवारीमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याची माहिती ढगे यांनी दिली.