मुंबई: राज्यातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना विविध सेवा एका डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘Maha-UPLABDHI’ (Maharashtra-Unified Pension Labh Digital Hub & Information) हे मोबाईल ॲप १ जुलैपासून कार्यान्वित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्यातील अनेक निवृत्तीवेतनधारकांना मासिक निवृत्तीवेतनाचा तपशील, आयकर कपात दाखला (Form-16), उत्पन्नाचा दाखला, शासन निर्णय आदी माहितीसाठी कोषागार कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जावे लागत होते. ज्येष्ठ नागरिकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला आहे.

प्रमुख उद्दिष्टे

  • निवृत्तीवेतनधारकांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सेवा उपलब्ध करून देणे.
  • निवृत्तीवेतनाशी संबंधित माहिती जलद, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने देणे.
  • कोषागार आणि अधिदान व लेखा कार्यालयांना प्रत्यक्ष भेटींची गरज कमी करणे.
  • वापरण्यास सोपी आणि सुरक्षित डिजिटल व्यवस्था निर्माण करणे.

पहिल्या टप्प्यात उपलब्ध होणाऱ्या सेवा

पहिल्या टप्प्यात खालील सुविधा देण्यात येणार आहेत:

  • Pension Payment History – २०२४-२५ पासूनच्या मासिक व वार्षिक निवृत्तीवेतनाचा तपशील PDF स्वरूपात.
  • Income Certificate – २०२४-२५ पासूनचे उत्पन्न प्रमाणपत्र.
  • e-PPO Library – ePPO, eCPO आणि eGPO च्या डिजिटल प्रती.
  • Form-16 – आर्थिक वर्ष २०२५-२६ पासूनचे Form-16, Form-A आणि Form-B.
  • Pension GR – निवृत्तीवेतन विषयक महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके.
  • New Announcements – नवीन सुविधा व महत्त्वाच्या सूचनांची माहिती.

Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध

‘Maha-UPLABDHI’ अँप Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. जिल्हा कोषागार कार्यालये आणि अधिदान व लेखा कार्यालयांमार्फत याची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुसऱ्या टप्प्यात आणखी सुविधा

ॲपच्या दुसऱ्या टप्प्यात ऑनलाईन हयातीचा दाखला (Life Certificate) आणि ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार निवारण प्रणाली (Pension Grievance Redressal Module) सुरू करण्यात येणार आहे. यासाठी तांत्रिक चाचण्या आणि सुरक्षा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र आदेश जारी करण्यात येतील.