अहिल्यानगर: राहुरी पोटनिवडणुकी पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीमधील गोंधळाची परिस्थिती उघड झाली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके व आमदार रोहित पवार यांनी लक्ष घालूनही महाविकास आघाडीची एकसंघता जिल्ह्यात निर्माण करता आलेली नाही. त्यामुळे राहुरी पोटनिवडणुकी पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीला महायुती पुढे आव्हान निर्माण करता आलेले नाही.

राहुरी पोटनिवडणुकीपेक्षा विधान परिषदेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीतील गोंधळ अधिक संभ्रम निर्माण करणारा ठरला आहे. आता काँग्रेसचेच परंतु अपक्ष उमेदवारी करणारे श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने यांना पुरस्कृत करतानाही काँग्रेसमध्ये गोंधळाची परिस्थिती असल्याचे उघड झाली आहे.

राहुरी पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शरद पवार गटाचे माजी आमदार तथा पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे वेगळी वाट स्वीकारण्याच्या मनस्थितीत असल्याचे त्यांच्या हालचालीवरून स्पष्ट दिसत होते. जयंत पाटील यांच्याबद्दलच संभ्रमाचे वातावरण असल्यामुळे त्यांचे भाचे तोच मार्ग स्वीकारणार, हे स्वाभाविक होते. प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतील उमेदवारीबाबत संभ्रमावस्था निर्माण केली. मात्र त्यांच्या भूमिकेला पक्षाला छेद देता आला नाही. परिणामी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे गोविंद मोकाटे यांनाच पक्षाचा एबी फॉर्म देऊन शरद पवार गटाला अखेरच्या क्षणी आपला उमेदवार म्हणून स्वीकारावं लागले.

पक्षाला तुल्यबळ व सक्षम उमेदवार देता आला नाही. एकाचवेळी झालेल्या बारामती व राहुरी अशा दोन्ही पोटनिवडणुकांसाठी पक्षाने दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. शरद पवार गटाकडून उमेदवार दिला जात नसल्याचे समजल्यानंतर काँग्रेसने उमेदवार देण्याचे त्यावेळी जाहीर केले होते. प्रत्यक्षात काँग्रेसने उमेदवार दिलाच नाही. राहुरी पोटनिवडणुकीत त्याचा परिणाम दिसला.

पोटनिवडणुकीनंतर लगेचच काही दिवसात जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व भाजपनेही त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे उमेदवारी दिली. राज्यपातळीवरील जागा वाटपात महाविकास आघाडीमध्ये अहिल्यानगरची जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले होते. उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने यांनी पक्षाचे आमदार हेमंत ओगले यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

करण ससाणे यांनीच आपण माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार अर्ज दाखल केल्याचे सांगितले. त्यानंतर थोरात यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन करण ससाने व दीप चव्हाण यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. पक्षाने दीप चव्हाण यांच्या नावाने एबी फॉर्म पाठवला, मात्र अखेरच्या क्षणापर्यंत चव्हाण यांनी अर्ज दाखल केलाच नाही आणि ससाने यांचा आर्जही अपक्ष म्हणूनच राहिला. जागा काँग्रेसला गेल्याचे जाहीर झाल्यानंतरही शरद पवार गटाने खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा काँग्रेसला जागा गेली असल्यामुळे श्रीमती लंके अर्ज दाखल करणार नसल्याचे जाहीर केले. आमदार रोहित पवार व खासदार लंके यांच्या उपस्थितीत ही विसंगती घडली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात नाही. आता आपलाच अपक्ष उमेदवार पुरस्कृत करण्याची वेळ काँग्रेसवर ओढावली आहे.