सातारा : नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले आहे. पुढील आठवडाभरासाठी महाबळेश्वर, पाचगणीसह परिसरातील सर्व लॉज, हॉटेल, खासगी बंगले, रिसॉर्ट, शेतघरे, पर्यटक निवास ‘हाऊसफुल’ झाले आहेत. नाताळपासून वाढू लागलेल्या या पर्यटकांच्या संख्येने आता गर्दीचे रूप धारण केले आहे. महाबळेश्वरमधील विविध पॉइंट, वेण्णा लेक, धार्मिक-ऐतिहासिक स्थळांसह, बाजारपेठ पर्यटकांनी फुलून गेली आहे.
दरम्यान, वाढत्या गर्दीने महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहण्यास मिळाले. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी बहरले आहे. महाबळेश्वर नववर्षाच्या स्वागतासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे, जिथे डिसेंबर-जानेवारीमध्ये थंडावा आणि निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. या काळात वेण्णा लेक, पॉईंट्स (विल्सन पॉइंट, आर्थर सीट) आणि आसपासच्या रिसॉर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, जिथे संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे आगाऊ नियोजन करणे आवश्यक आहे. सध्या थंड हवामान, हिरवीगार दृश्ये आणि धुक्यातील पर्वतांचा आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणून महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे.
महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असून, सध्या सहलीही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. पाचगणी, महाबळेश्वर, तापोळा येथील हॉटेल्स, रेस्टॉरंट, फार्म हाऊस ‘ऑनलाइन’ आगाऊ आरक्षण केले आहे. हॉटेल्स, लॉजसाठी पर्यटक विविध साइट्सच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’ आरक्षणाचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे येथील वाढत्या दरामुळे पर्यटकांना महाबळेश्वर येथील उत्साहानंतर वाईला मुक्कामासाठी यावे लागणार आहे. नववर्षानिमित्त हॉटेल्समध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे यावे त्यासाठी इमारतीला रंगरंगोटी विद्युत रोषणाई व जेवणासाठी विविध पदार्थांची रेलचेल करण्यात आली आहे. विविध चवदार पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
वाई, तापोळा, भिलार परिसरातील कृषी पर्यटन केंद्रांना ही तरुणाईची मोठी पसंती मिळत आहे. येथील हॉटेल्स, रिसॉर्ट्स, आणि क्लब्सनी नववर्ष साजरे करण्यासाठी (थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन) आकर्षक सोई आणि सवलती जाहीर केल्या आहेत. यात सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत रजनी, विशेष भोजनाचा समावेश आहे. काही हॉटेलचालक, मालकांनी गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. तर अनेकांनी इमारतीच्या गच्चीवर आणि सोसायटीच्या आवारात कौटुंबिक पार्टीचे नियोजन केले आहे.
बाजारपेठ सज्ज !
नववर्षांच्या स्वागतासाठी याठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. तसेच नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात जत्रेचे स्वरूप आलेले पाहायला मिळत आहे. नौका विहाराबरोबर खाद्य पदार्थाचा आस्वाद घेत धमाल मस्ती केली जात आहे. ऐन थंडीतही पर्यटक आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी ज्यूस, क्रीम, आईस गोळ्यांच्या गाड्यांवर गर्दी करत आहेत. महाबळेश्वरला पर्याय म्हणून आता पर्यटक, तापोळा, पाचगणी पर्याय म्हणून पहात आहेत. येथील बाजारपेठ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून, येथील प्रसिद्ध वस्तू आणि पदार्थांच्या खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत. येथील प्रसिद्ध चणे, जाम, जेली, चिक्की, चटकदार स्ट्रॉबेरी खरेदीसाठी ही गर्दी होताना दिसत आहे. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पर्यटक धम्माल मस्ती करत आहेत.
