सलग आलेल्या सुटय़ा आणि वाढलेल्या उकाडय़ामुळे महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची पर्यटनस्थळे सध्या ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत. या गर्दीमुळे या वर्षीचा पहिला हंगाम चांगला जाईल अशी आशा येथील छोटेमोठे व्यापारी व्यक्त करत आहेत.
गुरुवारी निवडणुकीची सुटी, शुक्रवारी गुड फ्रायडे आणि यानंतर शनिवार-रविवारची साप्ताहिक सुटी यामुळे या आठवडय़ात अनेकांना सलग चार दिवस सुटय़ा आलेल्या आहेत. सलग आलेल्या या सुटीमुळे अनेकांनी सहलीचे बेत आखले. यातही वातावरणात वाढलेल्या उकाडय़ामुळे अनेकांनी महाबळेश्वर, पाचगणी या थंड हवेच्या पर्यटनस्थळांना प्राधान्य दिलेले आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या या नंदनवनात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. महाबळेश्वरचे विविध स्थळांवरचे भ्रमण, वेण्णा लेक आणि तापोळय़ातील नौकाविहाराचा आनंद, घोडेस्वारी, सूर्योदय-सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन, वाई-प्रतापगडची भेट, विविध खेळांची लयलूट आणि बाजारपेठेतील खरेदी या साऱ्यांमध्ये पर्यटक सध्या गुंग आहेत. वेण्णा लेक परिसरात नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. यातच शनिवारी संध्याकाळी काही काळ पाऊस झाल्याने हवेत तयार झालेल्या गारव्याने पर्यटकांचा उत्साह आणखीच वाढला होता.
या पर्यटनाच्या जोडीनेच स्ट्रॉबेरीचा फलाहारही सध्या इथे आकर्षणाचा विषय ठरलेला आहे. या थंड हवेच्या ठिकाणी येणारे हे खास फळ अनेकांचे आकर्षण असते. सध्या या स्ट्रॉबेरीच्या फळांनी महाबळेश्वरचे रस्ते, बाजारपेठ फुलून गेलेली आहे. अनेक उत्पदकांनी त्यांच्या मळय़ातच ही स्ट्रॉबेरी खाण्याची पर्यटकांसाठी सोय केलेली आहे. या फळावर प्रकिया केलेले पदार्थही सध्या इथे मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी आलेले आहेत. स्ट्रॉबेरीच्या जोडीनेच विविध अन्य रानफळांनीही इथली बाजारपेठ भरून गेलेली आहे.
सलग सुट्टय़ांमुळे पर्यटकांची गर्दी वाढल्याने महाबळेश्वरकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचीही कोंडी होत होती.