महाबळेश्वरमध्ये जंगली गव्यांना दररोज पाव खायला देणं ‘त्या’ नागरिकाला महागात पडलं

शेतात दररोज संध्याकाळी चरायला येणाऱ्या जंगली गव्यांना खायला घालायचे पाव

महाबळेश्वरमध्ये जंगली गव्यांना एक नागरिक पाव खायला घालत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. याची दखल घेत वनविभागाने संबंधितांना वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावली आहे. वन्यजीव अभ्यासकांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत तो तातडीने थांबवावा, असे मत व्यक्त केले आहे.

इब्राहिम महंमद पटेल (रा. रांजणवाडी, महाबळेश्वर) यांच्या नावे महाबळेश्वरजवळ शेती व हॉटेल आहे. त्यांच्या शेतात गेल्या काही महिन्यापासून सायंकाळच्या वेळेला गवे चरायला येत होते. प्राणिमात्रांवरील दयेतून पटेल या गव्यांना खाण्यासाठी पाव टाकू लागले. हा रोजचा उपक्रम झाला. दोघांचीही भीती संपल्यानंतर पटेल गव्यांना हाताने पाव भरवू लागले. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर आला. यावर समाजमाध्यमांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. वनविभागाने या व्हिडिओची दखल घेत पटेल यांना नोटीस बजावून त्यांचा जबाब नोंदवला आहे. वन्यजीवांना खाद्यपदार्थ भरवणे नियमबाह्य आहे. पटेल यांचा हेतू लक्षात घेऊन वन्यजीव अधीनियमानुसार नोटीस बजावण्यात आली असल्याचे महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

‘वन्यजीवांना मानवनिर्मित खाद्य भरवणे हे निसर्गविरोधी कृती आहे. वन्यजीवांना खाद्यपदार्थ भरवल्याने त्यांना त्याची सवय लागते. ज्यावेळी हे पदार्थ मिळत नाहीत, तेव्हा माणसांवर हल्ले करून ते हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. यातून माणसाच्या किंवा वन्यजीवाच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. निसर्ग हा प्रत्येक प्राण्याची योग्य काळजी घेतच असतो. त्यामुळे वन्यजीवांना मानवी खाद्य भरवण्याची गरज नसते. मोर, माकड, कबुतरे अशा प्राण्यांना बाह्य खाद्य घालु नये. वन्यजीवांना विविध आजार असू शकतात. ते आजार माणसातही येऊ शकतात’, असा धोक्याचा इशाराही प्राणीप्रेमींनी दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mahabaleshwar man was feeding bread to wild animal gava got notice issued by the forest department sas

ताज्या बातम्या