सातारा : महाबळेश्वर तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. कोकणात जाण्यासाठी महत्त्वपूर्ण समजला जाणारा महाबळेश्वर ते पोलादपूर हा सुमारे ४० कि.मी.चा घाट पावसामुळे धोकादायक बनला आहे. जोरदार पाऊस कोसळत असल्याने छोट्या-मोठ्या दरडी कोसळण्याची भिती आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत बंद ठेवण्यात आली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे महाबळेश्वर ते तापोळा रस्ता खचला आहे. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना सुरू आहेत. तसेच रस्त्यावरून दोन ते तीन फूट पाणी वाहत आहे. झाडेही उन्मळून पडत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतापगड ते पोलादपूर या मार्गावरील आंबेनळी घाट रात्रीच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत या घाटातील वाहतूक बंद राहणार असल्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्वरचे उपअभियंता अजय देशपांडे यांनी दिली.