अलिबाग – महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात झालेल्या मारहाणीप्रकरणी भाजप नगरसेवक सुरज बामणे यांच्यासह तिघांविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कोळेकर जखमी झाले असून त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे महाड नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या दालनात कामकाज करत होते. यावेळी भाजप नगरसेवक सुरज बामणे राकेश पाटील आणि अन्य एक तिथे आले. प्रभागातील आणि प्रश्नावरून या तिघांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. यावरून वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारी पर्यंत पोहोचले.
या मारहाणीत मुख्याधिकारी कोळेकर जबर जखमी झाले. या घटनेनंतर मुख्याधिकारी कोळेकर यांनी भाजप नगरसेवक सुरज बामणे, राकेश पाटील, आणि अन्य एका व्यक्ती विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मुख्याधिकारी कोळेकर यांना तिघांकडून मारहाण करण्यात आली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी सुरज बामणे, राकेश पाटील आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, १२१(२), २२१, ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.या घटनेचा पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करीत आहेत. दरम्यान जखमी झालेल्या कोळेकर यांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर नगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
