महापूरानंतर महाड परिसरावर आता साथरोगाचे संकट येताना दिसत आहे. पूरानंतर १५ जणांना लेप्टो स्पायरेसीस तर तिघांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांनी तातडीने आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

२१ ते २३ जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड आणि पोलादपूर परिसराला महापूराचा तडाखा बसला. पूरानंतर महाड परिसरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. चिखलाचा एक ते दीड फूटांचा थर जमा झाला होता. धान्य कुजल्यामुळे दुर्गंधीही पसरली होती. पूरामुळे शेकडो जनावरेही मृत होऊन पडली होती. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती.
ही बाब लक्षात घेऊन महाड येथे ११ ठिकाणी तर पोलादपूर येथे दोन ठिकाणी आरोग्य तपासणीचे काम सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी डेग्यू, मलेरिया, लेप्टो स्पायरेसीस, काविळ आणि करोना तसेच इतर जलजन्य आजारांची तपासणी केली जात आहे. यासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पुणे महानगर पालिकांची आणि रायगड जिल्ह्याची आरोग्य पथके काम करत आहेत. या तपासणीत आत्ता पर्यंत महाड तालुक्यात १५ लेप्टोचे रुग्ण तर तीन करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने आरोग्य तपासणीसाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहनही केले आहे. पंचनामे करणाऱ्या पथकांसोबत ओआरएसची तीन पाकिटे आणि डॉक्सीसायक्लीन २ गोळ्यांचे वाटप केले जात आहे. जखम झालेल्या नागरिकांसाठी टिटॅनसच्या लसीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व प्रकारची औषधे महाड आणि पोलादपूर रुग्णालयांना उपलब्ध करून दिली आहेत. करोना चाचणीसाठी २५ हजार अँन्टीजेन कीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  मात्र करोना रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाईल या भीतीने नागरीक तपासणीसाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. घरांच्या साफसफाईचे काम आणि दुरुस्तीचे काम यामुळे रखडेल अशी भीती त्यांना वाटते आहे.

पण नागरीकांनी निःसंकोचपणे आरोग्य तपासणीसाठी समोर यावे. त्यांच्यावर गृहविलगीकरणातच उपचार केले जातील. सर्व प्रकारची औषधे घरीच उपलब्ध करून दिली जातील, असं आश्वासन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलं आहे.