महाड : ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सौंदर्यीकरणाचे ५५ कोटींचे काम एमआयडीसीकडे वर्ग केल्यामुळे तसेच तळ्यातील गाळ काढण्याच्या कामावरून महाड नगरपरिषदेच्या सभेत वादळी चर्चा झाली. चवदार तळ्याच्या सौंदर्यीकरणाचे काम एमआयडीसीकडे वर्ग केल्याने उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह अन्य नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले . मात्र या विषयावर सविस्तर चर्चेनंतर काही अटी घालून हा ठराव मंजूर करण्यात आला.

नगराध्यक्ष सुनिल कविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत संदीप जाधव, वजीर कोंडीवकर, हेमंत चांदलेकर आणि सुमित पवार हे आक्रमक झाले होते . हे काम करण्यासाठी महाड नगरपालिका सक्षम नाही का ? असा सवाल उपस्थित करीत नगरपरिषदेकडे शासनानेच दिलेले हे काम अचानक एमआयडीसी कडे काय म्हणून वर्ग केले ? अशी विचारणा संदीप जाधव केली. जाधव यांनी यापूर्वीचा दाखला देत ज्यावेळी चवदार तळ्याची कोसळलेली भिंत बांधण्याचे काम शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले होते, त्यावेळी तात्कालिक नगराध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी नगरपरिषद हद्दीतील कामे करण्यास अन्य कोणत्याही यंत्रणांना परवानगी न देण्याचा ठाम निर्णय घेतल्याची जाणीव करून दिली. नगरपरिषदेने त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला परवानगी न दिल्यामुळे शेवटी हे काम पुन्हा नगरपरिषदेकडेच वर्ग करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला होता. मात्र यावेळी अचानक असे काय घडले ? ज्यामुळे हे काम नगरपरिषदेकडून काढून घेण्यात आले असा प्रश्न संदीप जाधव यांनी उपस्थित केला. मात्र याविषयावर नगराध्यक्ष सुनिल कविस्कर समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. याविषयावर चर्चेअंती हा ठराव अटी घालून मंजूर करण्यात आला. चवदार तळ्यातील पाणी उपसा करण्याच्या कामाला कोणतीही मंजुरी मिळण्यापुर्वीच व नगपरिषदेची परवानगी न घेता एका ठेकेदाराने तळ्यातील पाण्याचा बेकायदेशीरपणे उपसा केला, या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संदीप जाधव यांनी या सभेत केली.

महाड शहरात सुरू असलेल्या पाणी टंचाईमुळे तळ्यातील पाणी उपसा केल्यास तळ्याच्या परिसरातील विहिरी व विंधण विहिरींची पातळी कमी झाल्यास पाण्याची भुषण टंचाई होण्याची भीती स्थानिक नगरसेवकांनी व्यक्त केली. यावर नगराध्यक्ष सुनिल कविस्कर यांनी टंचाई निर्माण झाल्यास नगरपरिषदेकडून टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक संकेत वारंगे, प्रमोद महाडीक , सनी जाधव, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, नगरअभियंता प्रविण कदम यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

या अटींवर ठराव झाला संमत

१) एमआयडीसी ने चवदार तळ्याच्या कामाचे पुर्णपणे सादरीकरण नगरपरिषदेत करावे . २)सदरचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावे, काम पुर्ण झाल्यानंतर नगरपरिषद खात्री करूनच ना हरकत दाखला देऊन देखभाल दुरुस्तीसाठी हे काम ताब्यात घेईल. ३) या कामासाठी लागणारा विद्युत पुरवठा ठेकेदारांने स्वखर्चाने घ्यावा.४)शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सात वर्षे एमआयडीसीने ही यंत्रणा चालवावी . व त्यानंतरच सुस्थितीत असलेली ही यंत्रणा नगरपरिषद हस्तांतरित करून घेईल. ५) या कामामध्ये नगरपालिका अधिकारी अथवा पदाधिकारी यांनी त्रुटी व उणिवा दाखवून दिल्या तर त्या दूर करण्याची जबाबदारी देखील एमआयडीसीची राहील. ६) काम करताना कोणत्याही प्रकारची तोडफोड झाल्यास त्याची दुरुस्ती देखील एमआयडीसीने करून द्यावी लागेल. या अटी नगरपालिकेकडून घालण्यात आलेल्या आहेत.