जिल्हा दूध संघाचे राजकारण रंगले असताना जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेत मात्र हातमिळवणी झाल्याचे वेगळेच चित्र शुक्रवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी पाहायला मिळाले.
आमदार महादेराव महाडिक (हातकणंगले), जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील (करवीर), जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे (पन्हाळा), राज्य परिवहन मंडळाचे संचालक ए. वाय पाटील (राधानगरी) हे चौघे बिनविरोध निवडून आले.
मुख्य म्हणजे ‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधी गोटात असलेले संजय मंडलिक यांनी सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारी घेतल्याने विरोधी गटाची हवा गेली आहे. विशेष म्हणजे ‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधकाची भूमिका बजावणारे कोरे यांनी आग्रह करून मंडलिक यांना सत्तारूढ गटात आणले आहे. हे चित्र पाहता बँकेच्या निवडणूक रिंगणात काही उमेदवार असले तरी त्यांची ताकद फारशी मजबूत नाही. राजाराम साखर कारखाना व गोकुळ या दोन्ही निवडणुकींत महाडिक यांना जेरीस आणणारे सतेज पाटील बँकेच्या निवडणुकीत मात्र एकाकी पडल्याचे दिसून येत आहे.