मुंबई: महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचे काम विशिष्ट संस्थेला निविदा प्रक्रिया न काढताच देण्यात आले. यात ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरेाप परिणय फुके यांनी विधान परिषदेत केला. हे आरोप बहुजन विकासमंत्री अतुल सावे यांनी फेटाळून लावले तरी संबंधित प्रकाराची विभागीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी करून दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

महाज्योती संस्थेमार्फत कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या कामात अनियमितता झाल्याच्या तक्रारी येत आहेत. आता कोट्यवधी रुपयांचे काम एका विशिष्ट संस्थेला दिले आहे. केंद्र सरकारशी संबंधित ‘सेक्टर स्किल काउंसिल’ ही संस्था असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, ५१ टक्के हिस्सा असलेल्या खाजगी संस्थेला निविदा प्रक्रिया न राबवता सुमारे ५०० कोटी रुपयांचे काम देण्यात आल्याचा आरोप लक्षवेधीद्वारे परिणय फुके यांनी केला.

हाज्योतीशी संबंधित तक्रारीची दखल घेण्यासाठी मंत्रालय स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करावे, अशीही मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना अतुल सावे यांनी महाज्योती योजनेला राज्य सरकारकडून सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी दिला जातो. त्यामुळे ५०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप कसा संभवतो, असा प्रश्न उपस्थित करत फुके यांचा आरोप फेटाळून लावला.

मात्र, परिणय फुके यांनी आरोपांची चौकशीची मागणी केली असता, सेक्टर स्किल काउंसिल संदर्भातील मुद्द्याची विभागीय अधिकाऱ्यामार्फत पडताळणी केली जाईल. या चौकशीत दोषी आढळून आल्यास कारवाई केली जाईल. तसेच भविष्यात अशा कामांसाठी निविदा प्रक्रियेबाबत अधिक दक्षता घेतली जाईल, असेही स्पष्ट केले.