अलिबाग- पेण येथील गणेशमूर्ती कारखान्यात तयार करण्यात आलेल्या महालक्ष्मीच्या मूर्तीची थायलंडमधील मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार आहे. सात फुट उंचीची अत्यंत देखणी फायबर मूर्ती यासाठी तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती आज बँकॉकसाठी रवाना होणार आहे.
पेण शहर हे गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी २५ ते ३० लाख गणेशमूर्ती येथून देश विदेशात पाठविल्या जातात. यातून ६० ते ६५ कोटी रुपयांची उलाढाल होते. परदेशातूनही पेणच्या गणेशमूर्तींना चांगली मागणी असेत. पण आता पेणमध्ये तयार होणाऱ्या देवीच्या मूर्तींनाही परदेशातून मागणी होऊ लागली आहे. नवरात्रीसाठी पेण आणि हमरापूर परिसरात महालक्ष्मी, शारदा, आणि कालीमातेच्या मूर्ती तयार केल्या जातात. या मूर्तींनाही मुंबई आणि राज्यातील विविध भागांतून मागणी होत असते.
पण आता थायलंड देशातील बँकॉक शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात पेण येथे तयार करण्यात आलेल्या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी दिपक समेळ यांच्या कार्यशाळेत ७ फुट उंचीची फायबरची महालक्ष्मीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. देवीची ही मूर्ती आज थायलंडसाठी रवाना होणार आहे. बँकाक शहरातील गणेश मंदिरात यापूर्वीच पेण शहरात तयार करण्यात आलेली गणेशमूर्ती विराजमान आहे. पाच वर्षांपूर्वी पुण्याच्या दगडूशेठ गणपतीशी साधर्म्य असलेली चार फुटांची गणेशमूर्ती बँकॉक येथे पाठविण्यात आली होती.
दिवाळीत महालक्ष्मीची सात फुटांची फायबर मूर्ती तयार करण्याची ऑर्डर मिळाली होती. गेली चार महिने त्यावर काम सुरू होते. ही मूर्ती तयार झाली असून, उद्या बँकॉक येथे रवाना होणार आहे. महिन्याभरात ती बँकाक येथे पोहोचणे अपेक्षित आहे. – निलेश समेळ, मूर्तीकार