करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू असून आता ती अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिरातील स्वच्छतेचे काम जवळपास पूर्ण झाले असून मंदिरात करण्यात आलेल्या नेत्रदीपक रोषणाईमुळे मंदिर झळाळून उठले आहे. देशभरातील सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था तनात करण्यात आली आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांना दर्शन सुलभ व्हावे याची दक्षता घेतली जात आहे.  
बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी विविध पातळीवर सुविधा करण्यात आली असून मंदिर परिसरात दर्शनासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. नेट बँकिंग, अभिषेक व नवेद्य शुल्क स्वीकारण्याची सोय करण्यात आली आहे. गरूड मंडपात दिवसभर देवीच्या पालखीसह अन्य चांदीच्या वस्तू व भांडी स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. महेश कडणे, कोंटेकर, संतोष नितलकर, संजय भांदिगरे, शैलेश इंगवले, निमणेकर, संकेत पोवार आदी कारागीर हे काम करीत होते.
दरम्यान, नऊ दिवस चालणाऱ्या अन्य कार्यक्रमांचीही जय्यत तयारी झाली आहे. मंदिर, शिखर स्वच्छता आणि डागडुजीचे काम जवळ-जवळ संपले असून सांस्कृतिक कार्यक्रमांचेही नियोजन झाले आहे. देवस्थान समिती आणि श्री पूजक मंडळाच्या वतीने कोल्हापूरसह मुंबई, पुणे, कराड, सोलापूर तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेशातील विविध मंडळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध संस्थांकडून भावगीते, भक्तिगीते, सोंगी भजन आदी कार्यक्रमांसाठी अर्ज आले असून यातील बहुसंख्य संस्थांना कार्यक्रम करण्याची संधी दिली जाणार आहे.
चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्रचे सदस्य प्रमोद पाटील यांनी मंदिर परिसराची पाहणी करून अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. मंदिरात नवरात्रोत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जातो. यासाठी शहर परिसरासह कर्नाटक, आंध्र तसेच गोवा राज्यातून अनेक भाविक मोठय़ा प्रमाणात येत असतात. त्यामुळे मंदिरात मोठी गर्दी झालेली असते. या भाविकांची गरसोय होऊ नये यासाठी अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण करावी यासाठी प्रमोद पाटील यांनी संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी देवस्थान समिती सहसचिव एस. एस.साळवी, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, चिकू गवळी, देशपांडे, सुरेश पाटील, धनाजी गुरव, गजानन चौगुले, सुरेश तळेकर, प्रल्हाद लोहार व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
अशी असतील देवीचे रुपे – नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीची सिंहासनारूढ रूपात पूजा बांधण्यात येणार आहे. त्यानंतर कन्याकुमारी, सौराष्ट्रनिल, खोडीचार माता, उमा महेश गणेश, ऐरावतारूढ, सरस्वती, आदिमाया, म्हैशासूर मर्दानी आणि खंडेनवमीला मयुरारूढ अशा विविध नऊ रूपात पूजा बांधण्यात येणार आहे.
महालक्ष्मी मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविली
नवरात्र महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर महालक्ष्मी मंदिर परिसरातील फिरत्या विक्रेत्यांचे अतिक्रमण सोमवारी महापालिकेने पोलीस बंदोबस्तात हटवले. महाद्वार रोड, जोतिबा रोड व भवानी मंडप परिसरातील सुमारे ५०० विक्रेत्यांना हटविण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख पंडित पोवार यांनी दिली. विक्रेत्यांचे जंजाळ कमी झाल्याने आता भाविकांना नवरात्र उत्सवात मंदिर परिसरातील वावर सुटसुटीत होणार असल्याने त्याचे भाविकांतून स्वागत केले जात आहे.
महालक्ष्मी मंदिर परिसरात ८०० फेरीवाले व किरकोळ विक्रेते आहेत. रस्त्यावर सलगपणे उभे राहणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच मंदिराच्या सुरक्षेला बाधा येण्याची शक्यताही गुप्तचर संघटनांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मंदिराचा परिसर अतिक्रमणमुक्त करावा, असा आदेश गुप्तचर संघटनांनी दिला होता. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी अतिक्रमणे हटविण्याबाबत बठक घेतली होती. मात्र त्याची अंमलबजावणी रेंगाळली होती. नवरात्र उत्सव तोंडावर आल्याने या विषयाला पुन्हा तोंड फुटले.
या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज या परिसरातील अतिक्रमणे हटविली. विशेष म्हणजे बहुतांशी विक्रेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने वादाचे प्रसंग उद्भवले नाहीत. मंदिराजवळ असलेल्या फुलविक्रेत्यांनी आपला नेहमीची पसारा आवरून मोजक्या जागेत विक्री करण्याचे मान्य केले. या मोहिमेवेळी महापालिकेचे नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, विक्रेत्यांचे प्रतिनिधी रमाकांत उरसाल, राजू नरके, सुरेश जरग आदी उपस्थित होते.