मुंबई : राज्यातील युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यात एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या मेळाव्यांत २५०० हून अधिक उद्योगसमूह सहभागी होणार असून यामध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, गोदरेज यांच्यासह अनेक नामांकित कंपन्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’साठी आतापर्यंत १,५८८ कंपन्यांनी नोंदणी केली असून, त्यांच्या माध्यमातून ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. या महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप, एलआयसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, बॉश, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सीएट यांसारख्या नामांकित कंपन्या व संस्थांचा सहभाग आहे. ऑटोमोबाईल, उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य, लॉजिस्टिक्स आणि इतर विविध क्षेत्रांतील कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

बारावी पास, आयटीआय, पदवी, डिप्लोमा, इंजिनीअरिंग आणि इतर कौशल्याधारित पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी विविध पदांवर संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तंत्रज्ञ, मशीन चालक, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक तसेच इतर पदांचा यामध्ये समावेश आहे तसेच शासनाशी निगडित संस्थांमध्येही काम करण्याची संधी युवकांना मिळणार आहे.

२९ सप्टेंबरपर्यंत नोंदणीकृत कंपन्यांचीची संख्या २,५०० हून अधिक होण्याची अपेक्षा आहे. आगामी काळात आणखी कंपन्या आणि उद्योगसंस्था सहभागी होणार असल्याने युवकांसाठी उपलब्ध रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून उद्योगक्षेत्राच्या मनुष्यबळाच्या गरजा आणि युवकांची कौशल्ये यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती लोढा यांनी दिली.