Maharashtra Municipal Corporation Election Results 2026: राज्यातील महानगरपालिका निकालानंतर सर्वांना महापौर निवडीचे वेध लागले आहे. आता राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्याबाबतचा निर्णय झाला आहे. मुंबईत नगरविकास विभागातर्फे ही सोडत काढण्यात येणार आहे.

यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यातील २९ पैकी २४ ठिकाणी भाजपा व महायुतीची सत्ता आली आहे. त्यामध्ये ९ महानगरपालिका निवडणुका स्वबःळावर लढल्या आहेत. या विक्रमी विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेकडे गेलो आणि त्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या महापालिकांत आम्हाला मिळालेले विक्रमी यश हे लोकांना विकास आणि प्रामाणिक कारभार हवा आहे हे दर्शविते”. तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेने या निवडणुकांत सत्ताधाऱ्यांनी यंत्रणांचा आणि पैशांचा भरमसाठ वापर केल्याचा आरोप केला आहे. तसेच बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत मतमोजणीवेळी वापरण्यात आलेल्या ‘पाडू’ मशीनवरही विरोधकांनी आक्षेप नोंदविला होता.

महापौरपदाची सोडत कधी सुटणार?

राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत महाराष्ट्र नगर विकास विभागाकडून काढण्यात येणार आहे. ही सोडत येत्या गुरुवारी (२२ जानेवारी २०२६) मंत्रालयात काढण्यात येणार आहे. याबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांत पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढल्या. तरीही त्यांना सत्ता काबीज करता आली नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाने विक्रमी कामगिरी करत सत्ता मिळवली. आता सर्व निवनिर्वाचित नगरसेवकांचे महापौर सोडतीकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाने ऐतिहासिक यश मिळवले आहे. येथे एमआयएम पक्ष दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.

जळगावमध्ये विक्रमी यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात सलग चौथ्यांदा कमळ फुलले आहे. तर चंद्रपुरात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत विक्रमी जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे जळगाव महापालिकेत भाजपाचा स्ट्राईक रेट १०० टक्के राहिला आहे. तिथे भाजपाने जेवढ्या जागा लढल्या तितक्या सर्व जागा जिंकल्या आहेत. तर लातूर महानगरपालिकेचा गड काँग्रेसने राखला आहे. अकोला महानगरपालिकेत भाजपाला बहुमताने हुलकावणी दिली आहे. आता येत्या गुरुवारी महापौरपदाची सोडत सुटणार असल्याने आता सर्व नगरसेवकांचे लक्ष त्या सोडतीकडे लागले आहे.