मुंबई : कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी गत दहा वर्षांपासून विविध कामांसाठी लॅपटॉप देण्याची मागणी करीत होते. त्यांच्या मागणीला अखेर यश आले असून, कृषी आयुक्तालयातून लॅपटॉप वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडल कृषी अधिकाऱ्यांना सुमारे १३,२७५ लॅपटॉपचे वितरण केले जाणार आहे.

कृषी विभागाच्या विविध योजना आणि कामे ऑनलाइन सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉप देण्याची मागणी होत होती. गतवर्षी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर लॅपटॉपच्या मागणीसाठी १३ दिवसांचा संप केला होता. त्यानंतर तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लॅपटॉपची मागणी मान्य करून प्रक्रिया सुरू केली होती.

लॅपटॉप की, टॅब वरून वाद

त्यानंतर लॅपटॉप द्यायचे की, टॅब द्यायचे, असा प्रश्न आयुक्तालयाच्या पातळीवरून उपस्थितीत करण्यात आला होता. पण, कर्मचाऱ्यांनी लॅपटॉपचा आग्रह कायम ठेवल्यामुळे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लॅपटॉप देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये त्या बाबतचा शासन निर्णय निघाला. त्यानंतर जून महिना उजाडेपर्यंत लॅपटॉप वितरण झाले नव्हते. अखेर बुधवारी, दहा जून रोजी आयुक्तालयाने विभागीय कृषी संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून लॅपटॉप वितरणाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील पाच दिवसांत वितरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील १०,६२० सहाय्यक कृषी अधिकारी, १,७७० उप कृषी अधिकारी आणि ८८५ मंडल कृषी अधिकारी, अशा सुमारे १३,२७५ कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देणे अपेक्षित आहे.

दहा वर्षांची प्रतीक्षा फळाला

गत दहा वर्षांपासून ऑनलाइन कामांसाठी कोणतीही सुविधा नसताना आम्ही ऑनलाइन कामे करीत आलो. आता लॅपटॉपचे वितरण सुरू झाले आहे. कृषिमंत्र्यांनी आमची मागणी मान्य केल्याचा आनंद आहे. आमच्या अन्य प्रलंबित मागण्याचाही सकारात्मक विचार व्हावा, असे मत महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विलास रिंढे यांनी दिली.

पंधरा दिवसांत वितरण

कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून लॅपटॉपची मागणी प्रलंबित होती. दर्जेदार, सर्व सोयी – सुविधायुक्त अद्ययावत लॅपटॉप दिले जाणार आहेत. पुढील पंधरा दिवसांत वितरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असे मत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.