भारतीय हवामान विभागाने एल निनोच्या पार्श्र्वभूमीवर कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामातील पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. सरासरी १५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. यंदा त्यात घट होण्याची शक्यता आहे. पाऊस कमी पडला तर पेरणी क्षेत्र १४० ते १४५ लाख हेक्टरपर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे.

खरीप हंगामात क्षेत्रावर सोयाबीन, भात, मका, तूर, उडीद, कापूस व ऊस या प्रमुख पिकांच्या पेरणीचा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने पूर्वतयारी सुरू केली आहे. यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सुमारे २० लाख क्विंटल बियाण्यांची गरज

बियाण्यांची गरज २०.१७ लाख क्विंटल असून २८.०५ लाख क्विंटल (१३९ टक्के) बियाणे उपलब्ध आहे. खरीप हंगाम २०२६ करिता राज्यास ४८.८० लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूर असून आतापर्यंत २५.१७ लाख मे.टन खते उपलब्ध आहेत.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा देशातील पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्के इतके राहण्याची शक्यता असून ‘एल निनो’ स्थितीमुळे पावसात अनियमितता व दुष्काळ परिस्थिती उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर राज्यात हवामान प्रतिरोधक बियाण्यांचा वापर, उताराला आडवी पेरणी, बीबीएफ तंत्राचा अवलंब, शेततळ्यांची निर्मिती, मल्चिंग व सेंद्रिय खतांचा वापर तसेच पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतींवर विशेष भर देण्याची गरज आहे.

थेट शेतकऱ्यांना प्रशिक्षण

खरीप हंगामपूर्व तयारी करिता क्षेत्रीय पातळीवरील अधिकारी/कर्मचारी यांच्या विभागस्तरीय व उपविभागस्तरीय कार्यशाळा राज्यात सुरु आहे. विभागीय व उपविभागीय कार्यशाळांद्वारे कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, केव्हीके शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतकऱ्यांच्या सहभागातून Hands on Training दिली जात आहे. या सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून कृषि विभाग खरीप हंगाम २०२६ मध्ये हवामानातील अनिश्चिततेशी सामना करण्यास शेतक-यांमध्ये जागृकता निर्माण करीत आहे.

गतवर्षी पडला होता १०९ टक्के पाऊस

मागील हंगामात राज्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान १०७५ मिमी असून, जून २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण ११७३ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. हे प्रमाण सरासरीच्या १०९ टक्के इतके असल्याने राज्यात समाधानकारक पर्जन्यमान झाले होते.

मागील हंगामात ऑगस्ट २०२५ मध्ये सरासरीच्या १०४ टक्के, सप्टेंबर २०२५ मध्ये १६५ टक्के, तर ऑक्टोबर २०२५ मध्ये ११४ टक्के पाऊस झाला. विशेषतः सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली असून शेतीला दिलासा मिळाला. राज्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ऊस वगळता १४४.३६ लाख हेक्टर इतके आहे. सन २०२५-२६ मध्ये १४३.५५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून हे प्रमाण सरासरीच्या ९९ टक्के आहे. त्यामुळे खरीप पेरणी जवळपास नियोजित क्षेत्रावर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

रब्बी हंगामात झाली होती ११६ टक्के पेरणी

रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र ५७.८० लाख हेक्टर असून सन २०२५-२६ मध्ये तब्बल ६७.२८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे प्रमाण सरासरीच्या ११६ टक्के इतके असून रब्बी हंगामात अपेक्षेपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड झाल्याचे दिसून आले आहे.

नैसर्गिक आपत्तीत १३६ लाख शेतकऱ्यांचे नुकसान

नैसर्गिक आपत्तीमुळे फेब्रुवारी २०२५ पासून राज्यातील १३६.२८ लाख शेतकऱ्यांचे १०५.८८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून २०,१९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन २०२६-२७ साठी खरीप हंगामात सुमारे १४५.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात येत असून त्यादृष्टीने कृषी विभागाने पूर्वतयारी सुरू केली आहे.

dattatray.jadhav@expressindia.com