राहाता : बोगस खते घेउन वैजापूरच्या दिशेने जाणाऱ्या मालमोटारीवर कारवाई करून ६ लाख २४ हजार रुपये किंमतीचे २३.८५ मेट्रिक टन संशयित रासायनिक खत जप्त करण्यात आले. ही कारवाई संवत्सर शिवारातील कोपरगाव – वैजापूर रस्त्यावर काल, मंगळवार रात्री करण्यात आली. या संदर्भात कोपरगाव पोलीस ठाण्यात मालमोटारीच्या चालकासह, पुणे, पंढरपूर व गुजरात येथील संबंधित चार खत कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातून बोगस खतांची मालमोटार वैजापूरच्या दिशेने जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कोपरगाव कृषी विभाग व कोपरगाव शहर पोलिस यांचे संयुक्त पथक कारवाईसाठी संवत्सर शिवारात मंगळवारी रात्री पोहोचले. संशयित मालमोटार (एम एच २० डी ई ०९९९ ) थांबवत पथकाने चालकाकडे चौकशी केली असता मालमोटारीत रासायनिक खत असल्याचे त्याने सांगितले. मात्र खताच्या खरेदी-विक्री संदर्भातील कोणतीही कागदपत्रे त्याच्याकडे आढळली नाहीत.
यानंतर मालमोटारीचा पंचनामा करून एकूण २३.८५ मेट्रिक टन संशयित रासायनिक खतांच्या ४ हजार ७७ बनावट खताच्या गोण्या जप्त करण्यात आल्या. त्याची अंदाजे किंमत ६ लाख २४ हजार रुपये आहे. ही कारवाई गणेश बिरदवडे (गुण नियंत्रक निरीक्षक, कृषी विभाग, कोपरगाव), मनोज सोनवणे (तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव), राहुल ढगे (जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, अहिल्यानगर) तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने व दीपक रोठे यांच्या संयुक्त पथकाने केली.
याबाबत गुण नियंत्रक निरीक्षक बिरदवडे यांनी पोलीसांकडे फिर्याद दिली. खत (नियंत्रण) आदेश १९८५ मधील विविध तरतुदी तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. विहित मानकांची पूर्तता नसलेल्या खताचे उत्पादन व विक्री, खताच्या गोण्यांवर खोट्या किंवा अस्तित्वात नसलेल्या उत्पादकांची नावे, खत नसलेल्या पदार्थाची खत म्हणून विक्री तसेच मागितलेली माहिती न देणे आदी गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अंतर्गत तसेच संबंधित कायद्यांनुसार मालमोटार चालकासह संबंधित ४ कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील आठवड्यातही अशाच पद्धतीने कोपरगांव कृषी विभागाने कारवाई केली होती. आताच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करीत आहे.
नमुने तपासणीसाठी पाठवले
संशयावरुन जप्त करण्यात आलेल्या तीन रासायनिक खतांच्या प्रकाराचे प्रत्येकी तीन नमुने घेऊन ते पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सर्व खताच्या गोण्या मोजणी करून गोदामात सीलबंद करण्यात आले. तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. – गणेश बिरदवडे, गुण नियंत्रक निरीक्षक, कृषी विभाग.
