मुंबई: नगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी डॉक्टर आणि परिचारिकांवर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्य परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी संघटनेने नगर जिल्हा रुग्णालयात गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले. तसेच या विरोधात निषेध व्यक्त करून राज्यातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी १५ नोव्हेंबपर्यंत काळय़ा फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा रुग्णालयातील आग लागलेली इमारत करोनाकाळात हस्तांतरित केले गेली. या इमारतीत वीज यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा आणि इतर सुविधा उपलब्ध करण्याबाबत कार्यरत असलेले डॉक्टर किंवा परिचारिकांचा काहीही संबंध नाही. आरोग्य विभागासह अन्य विभागांची यात चौकशी झाली नाही. त्यांचीही चौकशी केली जावी आणि डॉक्टर, परिचारिकांवरील कारवाई मागे घेण्याची मागणी करून संघटनेने गुरुवारपासून नगर जिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आरोग्य सेवा बंद केलेल्या आहेत.

याव्यतिरिक्त राज्यातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही आंदोलनाला पािठबा दर्शवून गुरुवापासून काळय़ा फिती लावून कामकाज सुरू केले आहे. सरकारने १५ नोव्हेंबपर्यंत याची दखल न घेतल्यास १६ नोव्हेंबरला राज्यात आरोग्य सेवा बंद करण्याचा निर्णय नाइलाजाने घ्यावा लागेल, असे संघटनेने सांगितले.

या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, प्रयोगशाळा.. रक्तपेढी, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी यासह महाराष्ट्र जिल्हा शल्यचिकित्सक संघटनाही सहभागी झाल्या आहेत.