हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला अखेर भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने या कांद्याला स्वत:ची ओळख मिळणार आह़े 

अलिबाग तालुक्यातील नेऊली, खंडाळे, कार्ले, वाडगाव आठ गाव येथे पांढऱ्या कांद्याचे उत्पादन होते. भात कापणीनंतर जवळपास २०० ते २५० हेक्टरवर या कांद्याची लागवड केली जाते. रुचकर आणि औषधी गुणधर्मामुळे हा कांदा प्रसिध्द आहे. शेतकऱ्यांनी या कांद्याचे शुध्द बियाणे संवर्धित केले आहे. या कांद्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखलेही १८८३ सालच्या कुलाबा राजपत्रात पाहायला मिळतात. त्यामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे, अशी जोरकस मागणी सुरू होती़    याबाबत गेली अनेक वर्षे शासन स्तरावर प्रयत्न सुरू होते. त्यासाठी कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यात याबाबत एक करार करण्यात आला होता. १५ जानेवारी २०१९ रोजी पांढऱ्या कांद्याच्या भौगोलिक मानांकनासाठी नोंदणी करण्यात आली होती. अलिबाग पांढरा कांदा उत्पादन संघही स्थापन करण्यात आला होता.  मुंबई येथील केंद्र सरकारच्या पेटंट नोंदणी कार्यालयात २९ सप्टेंबर २०२१ रोजी पांढऱ्या कांद्याच्या भौगोलिक मानांकन प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. यावेळी कृषी विद्यापीठाच्या भौगोलिक निर्देशांक विभागाचे प्रमुख जितेंद्र कदम, कल्पेश पाटील, जीएमजीसीचे प्रमुख गणेश हींगमिरे आणि शेतकरी उत्पादक संघाचे शेतकरी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगौलिक मानांकन बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  या मानांकनामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला स्वत:ची ओळख मिळेल, त्याची नाममुद्रा झळकेल आणि ग्राहकांची फसवणूक थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

आम्ही पिढय़ानपिढय़ा मोठय़ा कष्टाने पांढरा कांदा जोपासला आहे. या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याने आमचा हुरुप वाढला आहे. कांद्याच्या मागणीत आणि दरातही वाढ होऊ शकेल. 

सचिन पाटील, अध्यक्ष, पांढरा कांदा उत्पादक संघ

अलिबागमधील शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. भौगोलिक मानांकनामुळे अलिबागच्या नावाने इतर पांढऱ्या कांद्याच्या विक्रीस आळा बसेल़  आगामी काळात पांढऱ्या कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जातील़ 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डी. एस़ काळभोर, कृषी अधिक्षक, रायगड