महाराष्ट्रासह देशभरात गॅस आणि एलपीजीचा तुटवडा जाणवतो आहे. सामान्य माणसांचे हाल होत आहेत, लोक पुन्हा रांगेत उभे आहे. तरीही सरकार हे काहीही मान्य करायला तयार नाही. आम्ही विरोधात बोललो की देवेंद्र फडणवीसांना वाटतं की आम्ही देशातलं वातावरण खराब करतो आहोत. पण मोदींचं भजन करुन तुटवडा संपणार नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे?

माणसं मारायला ज्या माणसाला मजा येते, त्या माणसाच्या राष्ट्राशी मोदींनी गुलामीचा करार केला. राज्यात, देशात इंधन टंचाई आहे. गॅसची टंचाई आहे हे मान्य केलं पाहिजे, देशभरात एलपीजीसाठी रांगा लागल्या आहेत हे मान्य केलं पाहिजे. मुंबईसारख्या शहरात ४० टक्के हॉटेल व्यवसाय बंद पडला आहे, कामगार गावाकडे परतत आहेत हे मान्य केलं पाहिजे. अनेक देवस्थानांमध्ये जो प्रसाद मिळतो त्यात कपात केली गेली आहे. फक्त मोदींच्या नावे भजन करुन इंधन तुटवडा संपणार नाही, युद्ध संपणार नाही. एलपीजीच्या रांगा थांबणार नाही.हे भाजपाने लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही काही बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या झोंबतात. विरोधक वातावरण खराब करत आहेत, मोदींची बदनामी करत आहेत म्हणतात. मोदी स्वतःच स्वतःची आणि देशाची बदनामी करत आहेत. त्यांच्याकडे केरळ, आसाम, पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला जायला वेळ आहे. मग इंधन आणि गॅस टंचाईवर त्यांच्याकडे सर्वपक्षीय बैठक घ्यायला वेळ का नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

लोक हवालदिल झाले आहेत-संजय राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधीमंडळात गॅस तुटवड्याबाबत चर्चा केली पाहिजे. त्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता हवा आहे. पण तु्म्ही फक्त मोदींच्या नावाचं भजन करत आहात. काही नाही तुटवडा सांगत आहात. पण लोक हवालदिल झाले आहेत. गुजरातला पुरेसं कच्चं तेल, गॅस उतरवलं जाईल. जहाजं गुजरातला गेली आहेत. तिथे आधी मग देशाला उरलेलं सगळं मिळेल. देश मेला तरी चालेल तरी चालेल, रांगेत उभा राहिला तरीही चालेल, सगळं गुजरातला आधी मिळालं पाहिजे ही स्थिती आहे.

देश लॉकडाऊनच्या स्थितीत जातोय असं चित्र आहे, पण फडणवीसांना मान्य होणार नाही-राऊत

देश लॉकडाऊनच्या स्थितीत जातो आहे असं दिसतं आहे. पण देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य होणार नाही कारण असं बोललं तर मोदींची बदनामी होते. आम्ही अर्बन नक्षली आहोत असं फडणवीसांना वाटेल. देशात टंचाई आहे. कामगार घरी निघाले आहेत. हे सांगणं म्हणजे आम्ही अर्बन नक्षलावादी. जो काही छळ चालला आहे सामान्य माणसांचा ते करणारे सगळे महात्मे आणि रामाचे अवतार असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.