scorecardresearch

“जादूटोणा विरोधी कायदा देशपातळीवर लागू करा”, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने “जादूटोणा विरोधी कायदा देशपातळीवर लागू करावा”, अशी मागणी केली.

ANIS Program 2
महा अंनिसची राज्य कार्यकारिणी बैठक

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने “जादूटोणा विरोधी कायदा देशपातळीवर लागू करावा”, अशी मागणी केली. मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणमध्ये महा अंनिसची राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी ही मागणी करण्यात आली. या बैठकीला राज्यातील बहुतांश जिल्ह्यातून अंनिसचे २०० प्रतिनिधी उपस्थित होते.

“ऑगस्ट २०२३ मध्ये जादूटोणाविरोधी कायद्यास १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राज्यव्यापी कायदा प्रबोधन यात्रा काढण्यात येईल. तसेच देशभर हा कायदा लागू व्हावा.या मागणीसाठी ‘कायदा मागणी राष्ट्रीय परिषद’ आयोजित केली जाणार आहे,” अशी माहिती अंनिसने दिली. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील १० पुस्तिकांची निर्मिती या सहा महिन्यात केली जाईल. यामध्ये ५ पुस्तिका या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या असतील. अत्यंत कमी किमतीत या पुस्तिका जनतेसाठी उपलब्ध असतील, असंही सांगण्यात आलं.

या बैठकीत पुढील सहा महिन्याच्या कामकाजाबाबत चर्चा करुन जे निर्णय घेण्यात आले त्याची माहिती देताना अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल थोरात, अण्णा कडलास्कर म्हणाले की, अंनिसच्या वतीने मार्च एप्रिल, मे या महिन्यात संघटना बांधणी साठी राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. राज्यभरात अंनिसचे ५००० सभासद करण्याचे उद्दिष्ट राज्य कार्यकारिणीने घेतले आहे.

प्रा. डॉ. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियानाचे वर्षभरात १००० कार्यक्रम कार्यकर्त्यांनी केले आहेत. या अभियानाची समारोप परिषद सातारा येथे जुलै २०२३ मध्ये आयोजित करण्यात येईल. अंनिसच्या मानस मित्र प्रकल्पा अंतर्गत ‘भावनिक प्रथमोपचार’ यावर कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. हे सर्व निर्णय हे सामुहिक निर्णय प्रकियेतून घेण्यात आले आहे, असंही सांगण्यात आलं.

हेही वाचा : “पिंडीवर बर्फ झाल्याचा बनाव करणाऱ्यांविरोधात जादुटोणा विरोधी कायद्याची कलमं लावा”, अंनिसची मागणी

बैठकीला राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर, सम्राट हटकर नांदेड, प्रवीण देशमुख डोंबिवली, डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार सातारा, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव पुणे, राजीव देशपांडे बेलापूर, मुक्ता दाभोलकर मुंबई, प्रा. अशोक कदम बार्शी, फारुख गवंडी, राहुल थोरात सांगली, प्रकाश घादगिने लातूर, अंनिसचे ट्रस्टी दिपक गिरमे, गणेश चिंचोले, तसेच अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते अॅड. देविदास वडगावकर उस्मानाबाद, प्रभाकर नानावटी बेळगाव, डॉ. श्यामकांत जाधव अंबरनाथ, अनिल चव्हाण, कोल्हापूर, नरेंद्र कांबळे वर्धा, विजया श्रीखंडे नागपूर, संदेश गायकवाड पेण, संजय कोले इचलकरंजी यांच्यासह राज्यभरातून २०० कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 09:21 IST