scorecardresearch

Maharashtra News Updates : ठाण्याच्या सर्व बेकायदेशीर इमारतीमध्ये १० टक्के भागिदारी प्रमुख गुन्हेगारांना – जितेंद्र आव्हाड, वाचा प्रत्येक घडामोड एका क्लिकवर…

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकारणासह महाराष्ट्रातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…

jitendra awhad reaction on cm eknath shinde bhoomi pujan
जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

Maharashtra Breaking News Updates, 08 March 2023 : होळीच्या सुट्टीनंतर आज (८ मार्च) पुन्हा महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरलं जात आहे. बारावी प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आधीच फुटल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनातच सरकारवर हल्ला चढवला. त्यातच आता शेतकरी प्रश्नावरही विरोधक आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे आज जागतिक महिला दिन असल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी महिला दिनाचे कार्यक्रम होत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकारणासह महाराष्ट्रातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राजकारणासह महाराष्ट्रातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…

21:23 (IST) 8 Mar 2023
“ठाण्यात पाहिजे तो बंदुका काढतो, गोळ्या झाडतो आणि…”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

यातून ठाण्यात गुंडगिरी फोफावत आहे. गुंडांचं आर्थिक सक्षमीकरण होत आहे. मुंबईत एकेकाळी जे गँगवार झालं ते रिअल इस्टेटवरूनच झालं. ठाण्यातही ५-६ खून झाले. ठाण्यात पाहिजे तो बंदुका काढतो, गोळ्या झाडतो आणि त्याची तक्रारही घेतली जात नाही.

– जितेंद्र आव्हाड

21:23 (IST) 8 Mar 2023
ठाण्याच्या सर्व बेकायदेशीर इमारतीमध्ये १० टक्के भागिदारी प्रमुख गुन्हेगारांना – जितेंद्र आव्हाड

ठाण्याच्या सर्व बेकायदेशीर इमारतीमध्ये १०-१० टक्के भागिदारी तेथील प्रमुख गुन्हेगारांना दिली गेली आहे. म्हणजे त्यांची गँग जोडली जाते. हे करण्यासाठी त्यांनी महानगरपालिकेत एक माणूस बसवला आहे. तो हे सगळं सांभाळत आहे. सध्या ठाण्यात २००-३०० अनधिकृत इमारती बांधल्या जात आहेत. अजूनही बांधल्या जात आहेत. यावर कुणीच काही बोलायला तयार नाही. संजीव जैसवाल यांच्या काळात एक अनधिकृत इमारत बांधली जात नव्हती. मग अचानक प्रशासनात असा काय बदल झाला की अनधिकृत इमारतींचं पीक आलं आहे.

– जितेंद्र आव्हाड

19:59 (IST) 8 Mar 2023
मोदींनी ज्या मुख्यमंत्र्याला भ्रष्टाचारी म्हटलं त्याच्याच शपथविधीला हजेरी आणि मंत्रिमंडळात भाजपाचा समावेश – शरद पवार

भाजपाविषयी बोलायचं झालं, तर मेघालय आणि शेजारच्या राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्या प्रचारात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह दोघेही गेले होते. मोदींनी मेघालयच्या प्रचारात तेथील मुख्यमंत्री आणि तेथील राज्यकर्ते हे भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांचा पराभव करा असं सांगितलं. मात्र, निकालानंतर मोदी त्याच मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीलाही उपस्थित राहिले आणि त्यांच्या मंत्रिमंडळातही भाजपा सहभागी झाला. ही भूमिका आम्ही घेतलेली नाही.

– शरद पवार

19:55 (IST) 8 Mar 2023
नागालँडमध्ये भाजपाला पाठिंबा का दिला? शरद पवार म्हणाले…

नागालँडमध्ये एकंदर चित्र बघितल्यानंतर तिथं एकप्रकारे स्थैर्य येण्यासाठी तेथील मुख्यमंत्र्यांना आमची मदत होत असेल, तर ती करा, असा आमचा निर्णय आहे. त्यात भाजपा नाही.

– शरद पवार

19:42 (IST) 8 Mar 2023
महिला पोलिसांना आरोग्याचे धडे, जागतिक महिला दिनानिमित्त एनआरआय पोलिसांचा उपक्रम

नवी मुंबई महिला पोलिसांना जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून शारीरिक आणि मानसिक सक्षमतेने धडे तज्ज्ञांकडून देण्यात आले. व्यायाम तसेच वयाची मर्यादा न बाळागता महिलांना काय करता येवू शकते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी पोलीस ठाणे हद्दीतील विविध क्षेत्रातील प्रख्यात महिला तज्ज्ञ व तसेच महिला दक्षता समिती सदस्य, महिला सामाजिक संघटना सदस्य यांचेसह एन आर आय सागरी पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार अशा एकूण ४५ ते ५० महिला उपस्थित होत्या.

18:44 (IST) 8 Mar 2023
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना चहासोबत कालबाह्य तारखेची बिस्किटे

सोलापूर : मोठा गाजावाजा करून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा बावटा दाखवून सुरू केलेल्या मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सार्वत्रिक कौतुक होत असताना याच गाडीत प्रवाशांना चहासोबत दिली जाणारी बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वाचा…

17:45 (IST) 8 Mar 2023
कोल्हापूर : खासदार धैर्यशील माने यांचा ताफा रोखल्याने शिवसेनेच्या दोन गटांत सामना

कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक यांच्यात बुधवारी सामना रंगला. एका कार्यक्रमासाठी खासदार माने जात असताना त्यांना ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी ‘शिवसेनेशी गद्दारी का केली’, अशी विचारणा करीत रोखले. यातून ठाकरे-शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडल्याने निर्माण झालेला तणाव पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने दूर झाला.

सविस्तर वाचा…

17:16 (IST) 8 Mar 2023
मविआ सरकारमध्ये गृहमंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार नाराज? अधिवेशनात ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

छगन भुजबळ, जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील गृहमंत्री झाले, मात्र मीच गृहमंत्री झालो नाही, अजित पवारांचं अधिवेशनात वक्तव्य, तर्कवितर्कांना उधाण, देवेंद्र फडणवीस बोलत असताना पवारांचं मिश्किल वक्तव्य

17:05 (IST) 8 Mar 2023
जागतिक महिला दिनी क्रिकेटपटू उमेश यादवला कन्यारत्न

नागपूर : जागतिक महिला दिनी भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू उमेश यादव याला कन्यारत्न प्राप्त झाले. उमेश यादव दुसऱ्यांदा पिता झाला असून त्याने ट्वीटरवरून ही गोड बातमी दिली.

सविस्तर वाचा…

17:04 (IST) 8 Mar 2023
पंतप्रधान मोदी, अदानी विरोधात घोषणा देत काँग्रेसचे नागपुरात आंदोलन

नागपूर : दक्षिण नागपुरातील मेडिकल चौकातील भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयसमोर काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आलीत.

सविस्तर वाचा…

17:03 (IST) 8 Mar 2023
कृषी आणि सेवा क्षेत्रांत राज्याला फटका, दरडोई उत्पन्नात पाचव्या क्रमांकावर

कृषी आणि सेवा क्षेत्राने करोना काळातही राज्याला आधार दिला होता. करोनातून राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येत असली तरी गतवर्षाच्या तुलनेत कृषी आणि सेवा या दोन महत्त्वांच्या क्षेत्रांमध्ये राज्याची पिछेहाट झाली आहे. याशिवाय दरडोई उत्पन्नात महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य पाचव्या क्रमांकावर मागे पडले आहे.

सविस्तर वाचा..

17:03 (IST) 8 Mar 2023
अलिबाग : बैलगाडी शर्यतीदरम्यान जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू

अलिबाग – अलिबाग समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी बैलगाडी स्पर्धेदरम्यान जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विनायक जोशी आणि राजाराम गुरव, अशी मृतांची नावे आहेत. गेल्या सहा महिन्यांत बैलगाडी शर्यतीदरम्यान झालेली ही चौथी दुर्घटना आहे. त्यामुळे बैलगाडी स्पर्धेतील प्रेक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

सविस्तर वाचा…

16:49 (IST) 8 Mar 2023
“अजूनपर्यंत माझ्या पोरांच्या हक्काची संपत्ती त्यांच्या नावावर झाली नाही”, भर अधिवेशनात यशोमती ठाकूर भावुक

आज माझ्या यजमानांना जाऊन १८ वर्षे झालीत. अजूनपर्यंत माझ्या पोरांच्या हक्काची संपत्ती त्यांच्या नावावर झाली नाही. महिलांबद्दलच्या कायद्याची ही स्थिती आहे. हे महिला आणि बालकल्याणमंत्री राहिलेली महिला सभागृहाच्या पटलावर आणते आहे. मला जर हा त्रास होत असेल, तर सर्वसामान्य महिलांना काय त्रास होत असेल हा विचार सरकार करूही शकत नाही.

– यशोमती ठाकूर

16:15 (IST) 8 Mar 2023
“मंत्री असूनही मला त्रास झाला, तर मग…”, भर अधिवेशनात यशोमती ठाकूर भावुक

माझे यजमान गेल्यावर मला एक संघर्ष करावा लागला. मी तर मोठ्या घरातील होती, मोठ्या घरात माझं लग्न झालं होतं. सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करता मी फार वंचित कधीच नव्हते. असं असूनही माझ्या मुलांची नावं सातबारावर लावण्यासाठी माझ्यासारख्या महिलेला आपल्या देशात अजूनही संघर्ष करावा लागतो.

– यशोमती ठाकूर

15:01 (IST) 8 Mar 2023
वर्धा : अन्नाची टळली नासाडी, भुकेल्यांना मिळाली पुरणपोळी; ‘अनिस’चा समाजोपयोगी उपक्रम

वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा, ‘होळी लहान करा, पुरणपोळी दान करा’ हा उपक्रम अनाथांचा सण गोड करणारा ठरला.

सविस्तर वाचा…

14:59 (IST) 8 Mar 2023
मालमत्ता कर थकबाकीमुळे महाराष्ट्र बँक शाखेविरुध्द धुळे मनपाची कारवाई

एक कोटी, १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविल्याने महापालिकेच्या वसुली विभागातर्फे बुधवारी बँक ऑफ महाराष्ट्राची इमारत गोठविण्यात आली. आयुक्त देविदास टेकाळे यांनी कर वसुलीसाठी स्वतंत्र पथक नेमले असून या पथकामार्फत ठिकठिकाणी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सविस्तर वाचा…

14:58 (IST) 8 Mar 2023
नंदुरबार जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी ऑपरेशन अक्षता मोहीम – पोलिसांचा पुढाकार

राज्यात सर्वाधिक बालविवाहाची संख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी आता पोलीस दल पुढे सरसावले आहे. महिला दिनाचे औचित्य साधत बुधवारी पोलीस दलाने ऑपरेशन अक्षता ही योजना सुरु केली. सविस्तर वाचा…

14:41 (IST) 8 Mar 2023
मेट्रोची धाव आता उल्हासनगरपर्यंत; ‘मेट्रो ५’चा विस्तार करण्यासाठी लवकरच सल्लागारांची निवड

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेचा खडकपाडा मार्गे उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण – खडकपाडा आणि खडकपाडा – उल्हासनगर अशी ७.७ किमीची विस्तारीत मार्गिका दोन टप्प्यात बांधण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…

14:40 (IST) 8 Mar 2023
भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर आपत्कालीन स्थितीत समुद्रात उतरवण्यात आले

भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर बुधारी आणीबाणीच्या स्थितीत मुंबईनजिक समुद्रात उतरवण्यात आले.  हेलिकॉप्टरमधील   तीन्ही कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सविस्तर वाचा…

14:39 (IST) 8 Mar 2023
पुणे : मिळकत कराच्या सवलतीवरून सत्ताधारी- विरोधक आमने-सामने

मिळकत करातील ४० टक्क्यांची सवलत कायम ठेवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी आमने-सामने आले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सविस्तर वाचा…

14:38 (IST) 8 Mar 2023
मोठी बातमी! नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला पाठिंबा

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला पाठिंबा, कोहिमामध्ये झालेल्या बैठकीत निर्णय, राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांचा विजय, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

14:38 (IST) 8 Mar 2023
पुणे : कानून के हाथ लंबे होते हैं… वसंत मोरे यांची सूचक पोस्ट

मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे चिरंजीव रूपेश यांना धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर वसंत मोरे यांनी सूचक पोस्ट केली आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. कानून के हाथ बहुत लंबे होते है ! सविस्तर वाचा…

12:41 (IST) 8 Mar 2023
धंगेकरांनी केवळ पुण्यालाच नाही, तर संपूर्ण देशाला दिशा दाखवली – उद्धव ठाकरे

विरोधक एकत्र झाले तर जिंकू शकतात. ज्यावेळी काँग्रेस जोरात होते आणि इथं सखा पाटील हे मातब्बर उमेदवार होते. तेव्हा जॉर्ज फर्नांडिस नवखे उमेदवार होते. ते बाळासाहेब ठाकरेंचे चांगले मित्र होते. फर्नांडिस यांनी घोषणा दिली आपण यांना पाडू शकतो. चमत्कार घडला आणि जॉर्न फर्नांडिस जिंकले. त्याच विजयाची आठवण कसब्याने करून दिली. ३० वर्षे भाजपाचा बालेकिल्ला भुईसपाट करून रवींद्र धंगेकरांनी आपण जिंकू शकतो हा विश्वास केवळ पुण्याला नाही, तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला दिला. तसेच पुढील दिशा दाखवली.

– उद्धव ठाकरे

12:20 (IST) 8 Mar 2023
म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२३ : ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेतील विजेत्यांना घर परत करणे महागात पडणार

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ घरांसाठी सोडत काढण्यात येणार असून या घरांच्या सोडतीसाठी बुधवार, ८ मार्चपासून अर्ज विक्री, स्वीकृतीस सुरुवात झाली आहे. मात्र ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेतील घरांसाठी इच्छुक असलेल्यांना अंत्यत विचारपूर्वक अर्ज भरावा लागणार आहे. सविस्तर वाचा…

12:19 (IST) 8 Mar 2023
ठाण्यात धुलवडच्या दिवशी हत्येचा प्रयत्न ; भररस्त्यात तलवारीने हल्ला

कापूरबावडी येथील नळपाडा भागात दिवसाढवळ्या एका व्यक्तीने तलवारीने तरुणावर हल्ला केल्याचा प्रकार धुळवडीच्या दिवशी उघडकीस आला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात ध्रुव चौहाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…

12:17 (IST) 8 Mar 2023
Video : लोकल प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष, काळ्या फिती लावत आंदोलनद्वारे महिलांनी केला मध्य रेल्वेचा निषेध

मध्य रेल्वे मार्गावरील लोकलने दररोज हजारो महिला मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. या महिलांचा सुखकर, सुरक्षित, सोयीचा प्रवास यादृष्टीने मध्य रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याने त्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला रेल्वे प्रवाशांनी आज काळ्या फिती लावून प्रवास केला.

सविस्तर वाचा…

12:10 (IST) 8 Mar 2023
पुणे: राज्याच्या काही भागांत गेल्या २४ तासात पावसाची हजेरी; मध्य महाराष्ट्रात गारा, आजही हलक्या सरींची शक्यता

पुणे: राज्याच्या अनेक भागांमध्ये सोमवार आणि मंगळवारी (६, ७ मार्च) पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तसेच ठाण्यात गारांचा पाऊस, तर राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आजही (बुधवार, ८ मार्च) राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या हजेरीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

वाचा सविस्तर…

12:06 (IST) 8 Mar 2023
नौदलाच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उतरले भर समुद्रात

नौदलाच्या एका हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे मुंबईजवळ भर समुद्रात emergency landing करावे लागले आहे. हेलिकॉप्टरमधील एकुण तीन अधिकारी आणि नौसैनिकांची नौदलाच्या गस्ती नौकेने सुखरुप सुटका केली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत. हे हेलिकॉप्टर 'ध्रुव ' प्रकारातील होते.

( संग्रहित छायाचित्र )

11:58 (IST) 8 Mar 2023
राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये १३,७२९ हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे – देवेंद्र फडणवीस

राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये १३,७२९ हेक्टर शेतीचं नुकसान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अधिवेशनात माहिती

11:50 (IST) 8 Mar 2023
“जय बेळगाव, जय कर्नाटक” घोषणेबाबत आमदार धीरज देशमुख यांच्याशी माहिती घेऊन बोलणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया

गोंदिया – एका मेळाव्यात काँग्रेस पक्षाचे आमदार धीरज देशमुख यांनी “जय बेळगाव, जय कर्नाटक” अशी घोषणा दिली होती. देशमुख यांनी फेटा घालून दिलेल्या या घोषणेची सर्वत्र चर्चा असताना या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर वाचा…

11:49 (IST) 8 Mar 2023
देवेंद्र फडणवीस हिंदू देवस्थानच्या जमिनी हडप करणाऱ्यांना किती दिवसात अटक करणार? – जयंत पाटील

“तक्रारदाराने धाडस दाखवून तक्रार केली. त्यामुळे त्याला संरक्षण दिलं पाहिजे. त्याच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल झाले आहेत, हे पोलीसही मान्य करतात. त्यामुळे त्याला पूर्ण संरक्षण दिलं पाहिजे. हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करणाऱ्याला योग्य प्रायश्चित देणं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळतील, असं मला वाटत नाही. जो गुन्हेगार असेल त्याचा पिच्छा पुरवण्याचं काम ते करतील का? किती महिन्यात गुन्हेगारांना अटक होईल? आणि राज्य सरकार किती दिवसात हडप केलेल्या हिंदू देवस्थानच्या जमिनी परत देवस्थांनांना मिळवून देईल?

– जयंत पाटील

11:42 (IST) 8 Mar 2023
देवस्थान जमीन घोटाळाप्रकरणी आरोपींविरोधात कोणती कारवाई केली? – जयंत पाटील

हे प्रकरण फार गंभीर आहे. या प्रकरणात पोलीस, भ्रष्टाचार विरोधी विभाग वेळकाढूपणा करत आहे. हे प्रकरण पुढे ढकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर एसीबीने बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चौकशी केली आहे का? आरोपींविरोधात तपास अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली?

– जयंत पाटील

11:30 (IST) 8 Mar 2023
देवस्थानांच्या जमिनी हडप केल्याची तक्रार देणाऱ्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल – जयंत पाटील

सरकार बदलल्यावर तक्रारदाराचं निशुल्क संरक्षण काढून टाकण्यात आलं. तसेच तक्रारदारावर अहमदनगरमध्ये पॉक्सोअंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे तक्रारदाराला संरक्षण देण्याचं राहिलं, त्याचं संरक्षण काढण्यात आलं. त्याच्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातून तक्रारदाराला नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला.

– जयंत पाटील

11:29 (IST) 8 Mar 2023
मुंबई: नवी निवृत्ती योजना, १५ वर्षांनंतरही धोरण निश्चितीत अपयश

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत मे २००८ नंतर रूजू झालेल्या असंख्य अधिकारी, कर्मचारी, कामगारांसाठी नवीन निवृत्ती योजना लागू करण्यात आली असून जुन्या निवृत्ती योजनेतील अनेक लाभांपासून ही मंडळी आजही वंचित आहेत. गेली १५ वर्षे या संदर्भात धोरण आखण्यात आलेले नाही.

वाचा सविस्तर…

11:18 (IST) 8 Mar 2023
बीडमध्ये हिंदू देवस्थानांची जमीन हडप करण्याचा मोठा प्रकार, जयंत पाटलांचा अधिवेशनात गंभीर आरोप

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पिंपळेश्वर महादेव देवस्थान, विठोबा देवस्थान, रामचंद्र देवस्थान अशा हिंदू देवांच्या मंदिराच्या ट्रस्टची जमीन हडप करण्याचा मोठा प्रकार झाला आहे. हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण सहन करणार नाही याची मला खात्री आहे. पिंपळेश्वर महादेव ट्रस्टमध्ये एका दुधसंघाच्या कर्मचाऱ्याच्या नावाने ५०-६० एकर जमीन आहे. विठोबा देवस्थानाची जमीन मनोज रत्नपारखे या व्यक्तीच्या नावावर आहे. रामचंद्र देवस्थानची जमीन रोहित जोशी यांच्या नावावर वर्ग झाली.

– जयंत पाटील

11:08 (IST) 8 Mar 2023
पिकांची राखरांगोळी, शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त – नाना पटोले

शेतकऱ्यांच्या पिकांची राखरांगोळी झाली आहे. त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं. यापेक्षा मोठं काय होऊ शकतं? हे सगळं कामकाज बंद केलं पाहिजे. आज सरकारची शेतकऱ्यांबाबत भूमिका काय आहे? मागील आठवड्यातही कांदा-कापूस शेतकऱ्यांच्या प्रश्न समोर आला होता – नाना पटोले

11:04 (IST) 8 Mar 2023
वर्धा : पाचव्या वर्गातील गौरीने केला शंकरपटास प्रारंभ; मध्यप्रदेशसह विदर्भातील १०० बैलगाड्यांची थरारक स्पर्धा

वर्धा : बैलगाडा शर्यतींवर लावण्यात आलेली बंदी उठल्यानंतर लगेच गावगाड्यात उत्साह संचारला. माजी आमदार अमर काळे यांनी पुढाकार घेत तळेगावला शंकरपटाचे आयोजन केले.

सविस्तर वाचा..

10:49 (IST) 8 Mar 2023
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी, अजित पवार, छगन भुजबळ, अंबादास दानवे, बंटी पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित

10:46 (IST) 8 Mar 2023
पुणे : शहरात आजही पावसाची शक्यता

सोमवारी आणि मंगळवारी शहरात झालेल्या पावसानंतर आजही शहरात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

10:45 (IST) 8 Mar 2023
इंदापूरमधील माळवाडीत दरोडा, चोरटे गजाआड; पावणे नऊ लाखांचे दागिने जप्त

इंदापूर परिसरातील माळवाडीत दरोडा घालून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून पावणे नऊ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणी सागर अरुण राऊत (रा. टेंभुर्णी), दादा बळी शेंडगे (रा. इंदापूर) यांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

10:34 (IST) 8 Mar 2023
एका सुंदर सापाच्या प्रजातीला मिळाले विदेशात अस्तित्व; भारतीय संशोधकांचाही मोलाचा वाटा

नागपूर : तुर्कमेनिस्तान देशातून नुकत्याच एका सुंदर सापाच्या प्रजातीला त्याचे अस्तित्व मिळवून देण्याचे काम वन्यजीव संशोधकांनी केले आहे. या संशोधनामध्ये ११ देशांमधील विविध संशोधकांचा समावेश आसून, भारतामधून अमीत सैय्यद, विवेक शर्मा, एस. आर. गणेश, तसेच एच. टी. लारेमसंगा यांचा मोलाचा वाटा आहे.

सविस्तर वाचा…

10:17 (IST) 8 Mar 2023
ऐरॉक्स टेक्नॉलॉजीची ७५० कोटींच्या ‘आयपीओ’ योजनेतून माघार

वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रातील ऐरॉक्स टेक्नॉलॉजीने ७५० कोटी रुपयांची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) योजना गुंडाळत असल्याचे नुकतेच जाहीर केले.

सविस्तर वाचा…

10:16 (IST) 8 Mar 2023
नागपूर : ‘कुनो’तील चित्ते घेणार मोकळा श्वास, पण…

नामिबिया येथून आणलेल्या पहिल्या तुकडीतील तीन चित्त्यांना मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या खुल्या जंगलात सोडण्यात येणार आहे. यात दोन मादी आणि एका नर चित्त्याचा समावेश आहे. त्यादृष्टीने मध्यप्रदेश वन्यजीव मुख्यालयाची तयारी सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा…

10:15 (IST) 8 Mar 2023
भंडारा : धूलिवंदनाच्या दिवशीच काळाचा घाला! तलावात पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

भंडारा : धूलिवंदनाच्या दिवशी गावाशेजारील तलावावर पोहायला गेलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील लाखोरी गावात घडली. चैतन्य राजेश मुटकुरे, असे मृत मुलाचे नाव आहे. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

सविस्तर वाचा…

10:14 (IST) 8 Mar 2023
अवकाळीने खचलेल्या बळीराजाला मदत करा-अजित पवार

६ ते ९ मार्च या कालावधीत हवामान बदलणार आहे आणि वादळवारा, अवकाळी पाऊस येईल हे सांगितलं गेलं होतं. ते महाराष्ट्रात घडलं आणि शेतकरी राजाचं, बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे. आंब्याचा मोहोर, हरभरा, गहू मका, ज्वारी पिक, भाजीपाला, द्राक्षं अशी अनेक पिकं यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी खचून गेला आहे. त्या खचलेल्या बळीराजाला मदत करा असं आवाहन आम्ही सरकारला करणार आहोत असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.

10:14 (IST) 8 Mar 2023
Women’s Day 2023 : आकाशाला गवसणी घालणारी कॅप्टन कृतज्ञा

Women’s Day 2023 : पारंपारिक मासेमारी व्यवसायाला फाटा देत तिने लहानपणापासूनच आकाशात उंच उडण्याचे स्वप्न उरी बाळगले होते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने आपले स्वप्न प्रत्यक्षात साकारले. अनेक अडचणींवर मात करत तिने आज एक यशस्वी वैमानिक म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. आज अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींसाठी कॅप्टन कृतज्ञा खऱ्या अर्थाने प्रेरणा स्त्रोत बनली आहे.

सविस्तर वाचा…

09:50 (IST) 8 Mar 2023
“आज एका गोष्टीची खंत वाटते की…”, अजित पवारांनी मांडली भूमिका; म्हणाले, “काय अडचण आहे कळायला मार्ग नाही!”

अजित पवार म्हणतात, “मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही.”

वाचा सविस्तर

09:49 (IST) 8 Mar 2023
महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल होणार, चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “मी प्रदेशाध्यक्ष झालो तेव्हाच…”!

बावनकुळे म्हणतात, ” मी सहा महिन्यांपूर्वी राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कारभार स्वीकारला. त्यानंतर पुनर्रचना करण्याचा विचार होताच. पण…!”

वाचा सविस्तर

09:32 (IST) 8 Mar 2023
गडचिरोली : मारहाणप्रकरणी नाना पटोलेंच्या भावावर गुन्हा

डॉ. प्रमोद साळवे यांना गडचिरोली- चातगाव बोदली गावाजवळ गाडी अडवून अपहरण, मारहाण व शिवीगाळ  केल्याच्या तक्रारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे भाऊ विनोद पटोले यांच्यासह पाच व्यक्तींवर गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत. सविस्तर वाचा…

09:30 (IST) 8 Mar 2023
“तुम्ही शौचालयाला जाण्यास घाबरता कारण…”, ट्विटर कर्मचाऱ्याचं एलॉन मस्क यांना जोरदार प्रत्युत्तर

ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी एका ट्विटर कर्मचाऱ्यावर अपंगत्वाला ढाल केल्याचा आरोप केला. यानंतर या कर्मचाऱ्याने मस्क यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच त्याला नेमकं कशामुळे अपंगत्व आलं आहे याची सविस्तर माहिती देणारी ट्वीट्सची मालिकाच पोस्ट केली. मस्क यांनी कर्मचाऱ्यावर त्याच्या अपंगत्वावरून टीका केल्याने ट्विटर वापरकर्त्यांनीही मस्क यांच्यावर जोरदार टीका केली.

सविस्तर वाचा…

Maharashtra Live GIF

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

First published on: 08-03-2023 at 09:24 IST
ताज्या बातम्या