मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बुधवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विधेयक मंजुरीला आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सत्ताधारी बाकावरच्या सदस्यांनी पुढाकार घेत शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ गेला. विरोधकांनी सभात्याग केल्याने चर्चेविना दोन विधेयके अधिवेशन संस्थगीत करण्यास काही मिनीटे बाकी असताना मंजूर झाली.
भांडवली मूल्य निश्चित करणे, मालमत्ता कर बसवणे आणि गोळा करणे याच्याशी संबंधित मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्याचे हे विधेयक होते. मुख्यमंत्री फडणवीस यांचे अंतिम आठवडा प्रस्तावाचे उत्तर आज सायंकाळी ६ वाजता संपले आणि ते सभागृहातून निघून गेले. त्यानंतर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सदर विधेयक मांडले. शिवसेनेचे सुनील प्रभू आणि भास्कर जाधव हे विधेयकावर बोलायचे आहे, अशी मागणी करत उभे होते.
आम्हाला बोलू द्या नाहीतर आम्ही सभागृहाबाहेर जातो, असे जाधव म्हणाले. त्यावर पहिल्या बाकावर असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जा.. जा.. असे खाली बसून हातवारे करत म्हणाले. त्यावरुन वाद सुरू झाला. दोन्ही बाजुचे सदस्य तावातावाने बोलू लागले. काही जण अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत आले. गोंधळ वाढतच गेला. शेवटी सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. गोंधळानंतर लागलीच मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात आले.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभात्याग मागे घेत सभागृहात प्रवेश केला. मात्र तो पर्यंत महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम सुधारणा विधेयक खंडश: विचारात घेण्यात आले होते. त्यामुळे त्या विधेयकावर बोलण्याची संधी विरोधी सदस्यांना मिळाली नाही. अशा प्रकारे अधिवेशन संस्थगीत होण्यास तासभर अवधी बाकी असताना दोन विधेयके कोणत्याही चर्चेविना विधानसभेत मंजूर करण्यात आली.
यावेळी सभापती राहूल नार्वेकर यांनी सभागृहाला जोरदार कानपीचक्या दिल्या. सदर विधेयक आजच्या कार्यक्रम पत्रिकेत दर्शविण्यात आले होते. विधेयक मांडण्यास मी अनुमती देत होतो. त्याचवेळी सदस्य बोलण्यास परवानगी देण्याची मागणी करत होते. हा प्रकारा अत्यंत चुकीचा आहे. सायटेशन वाचण्यापूर्वीच विधेयकावर बोलण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही. विधेयकाच्या प्रथा, परंपरा व कामकाजाचे नियम सर्वांनीच पाळायला हवे, असे ते म्हणाले.
