राज्यातील विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्या अनुषंगाने विविध पक्षांच्या उमेदवारांना भुलविणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. आपल्याजवळ समाजाची किती मते आहेत, किती युवक आपल्या पाठिशी आहेत व आपल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल, हे गणित सांगणाऱ्या या टोळ्या आहेत. सध्या प्रत्येक उमेदवाराकडे त्या फिरकत आहेत.
उमेदवाराचे नाव घोषित होण्यापूर्वीच व काही संभाव्य उमेदवार आहेत, हे पाहून आपला विशिष्ट भागात कसा दबदबा आहे,आपण कसे लोकांना मतदानाला बाहेर काढतो व आपल्या इशाऱ्यावर लोक आपण म्हणू त्यालाच मतदान करतात, असे पटवून देणाऱ्या लोकांचा या टोळ्यांमध्ये समावेश असून त्यासाठी उमेदवारांकडून भली मोठी रक्कम लाटण्याचे गणित या टोळ्यांना जमले आहे. भाजपा व सेनेचा उमेदवार असेल तर भगवी छापी घालून हे टोळीवाले उमेदवाराकडे हजर होतात. त्यांच्या पाया पडण्याचे शानदार नाटक करतात. भाऊ, तुम्हीच कसे श्रेष्ठ आहात, हेही समजावून सांगतात. विरोधी उमेदवाराचा कसा बोजवारा उडणार आहे, तेही गणित हे पठ्ठ्े त्या उमेदवारासमोर अगदी विश्वासाने मांडतात व शेवटी आपल्या कामाचा भाव सांगून ते पैसे वसूल करतात, अशी या टोळीच्या कामाची पद्धत आहे.
काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर त्यांच्या विचाराच्या हिशेबाने यांचा पोषाख असतो. सोबतच राजकीय जाती-जमातीचे व संख्येचे गणित यांना तोंडपाठ असते. आपल्या मागे किती युवक आहेत व तुम्हीच कसे योग्य आहात, हे उमेदवारांना अशा काही आविर्भावात पटवून सांगतात की पाहणाऱ्याला वाटते की, यालाच उमेदवारापेक्षा जास्त काळजी आहे. यांचे चेलेही पटवून ठेवलेले आहेत. आपले भाऊ कसे हिंमतबाज आहेत व कसे काम करतात, हे चेले त्यावेळी मोठय़ा आवेशाने त्या उमेदवारासमोर मांडतात. पुन्हा जातांना हे टोळीबाज उमेदवाराच्या पाया पडून बाहेर पडतात. असे सत्र सध्या सुरू झाले आहे.
मतदानाच्या दिवशी अर्थातच, यापैकी कोण कोठे आहे, हे त्या उमेदवारालासुद्धा कळत नाही. अर्थात, राजकारणात मुरलेले नेते इतके काही अधांतरी नसतात. तेही यांना चांगलेच ओळखून आहेत, पण वेळ कशी मारून न्यायची व हे किती उपद्रवखोर आहेत व यांच्या उपद्रवमूल्याचा कसा फायदा घ्यायचा, हा विचार उमेदवार करतात व तसा त्यांचा वापरही करतात.