विदर्भात घराणेशाहीची परंपरा

भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला असला तरी राजकारणात घराणेशाही मात्र संपलेली नाही. नेहरू आणि गांधी घराण्याने राजकीय वारसा त्यांच्याच कुटुंबात सुरू ठेवल्याबद्दल ते नेहमीच टीकेचा विषय बनले असले तरी सर्वच राजकीय पक्षांमध्ये काही ना काही प्रमाणात ही परंपरा कायम राखली गेल्याची उदाहरणे आहेत

भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला असला तरी राजकारणात घराणेशाही मात्र संपलेली नाही. नेहरू आणि गांधी घराण्याने राजकीय वारसा त्यांच्याच कुटुंबात सुरू ठेवल्याबद्दल ते नेहमीच टीकेचा विषय बनले असले तरी सर्वच राजकीय पक्षांमध्ये काही ना काही प्रमाणात ही परंपरा कायम राखली गेल्याची उदाहरणे आहेत आणि सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येत आहे. घराण्यामध्ये पारंपरिक व्यवसाय असला की त्या व्यवसायात आपली नवीन पिढी यावी, असे अनेकांना वाटत असल्यामुळे ते मुलाला किंवा मुलीला त्या व्यवसायाचे ज्ञान देऊन तयार करतात. त्यात राजकारण मागे नाही. आज राजकारणात असलेले अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपला वारसा पुढे कायम राहावा यासाठी मुलगा, मुलगी आणि पुतण्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. अनेक नेते आज प्रत्यक्ष निवडणुका लढत आहेत, तर काही नेत्यांनी आपल्या वारसांना राजकारणात आणून राजकीय वारसा पुढे सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. नागपूर, रामटेक आणि वर्धा या तीन मतदारसंघातून वेगवेगळ्या वेळी निवडून आलेले दत्ता मेघे यांचे पुत्र समीर मेघे हिंगणा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. भद्रावती मतदारसंघातून दादासाहेब देवतळे दोनवेळा निवडणूक जिंकले होते. आघाडीचे सरकार असताना ते मंत्री होते. आता त्याचे चिंरजीव आणि राज्याचे मंत्री संजय देवतळे वरोरा मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव वंजारी यांचे चिरंजीव अभिजित पूर्व नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे दोन्ही चिरंजीव आशिष आणि अमोल निवडणूक रिंगणात आहेत. आशिष हे भाजपकडून काटोल मतदारसंघातून तर अमोल रामटेक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊ मूळक यांचे चिरंजीव राजेंद्र मुळक राज्यात अर्थराज्यमंत्री होते. ते सुद्धा कामठी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत दुसऱ्यांदा अमरावती मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. गंगाधरराव फडणवीस यांचे चिरंजीव देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे चिरंजीव राहुल ठाकरे, काँग्रेस नेते विनोद गुडधे पाटील यांचे चिरंजीव प्रफु ल्ल गुडधे, शिवसेनेचे नेते आणि खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ, काँग्रेस नेते सुधाकरराव गणगणे यांचे पुत्र मनीष गणगणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णराव पांडे यांचा मुलगा किरण पांडव, आमदार मितेश भांगडिया यांचा मुलगा कीर्तीकुमार भांगडिया, भाऊसाहेब फुंडकर यांचा मुलगा आकाश फुंम्डकर, प्रभा राव यांचा भाचा रणजित कांबळे आदी नेत्यांचे वारसदार निवडणूक लढवित असून राजकारणाचा वारसा समोर नेण्याचा प्रयत्न करीत आहे. कृष्णराव पांडव काँग्रेसमध्ये असले तरी त्यांचा मुलगा शिवसेनेकडून निवडणूक लढवित आहे. राजकारणातील सध्याचा कल लवकरात लवकर कोणत्या तरी निवडणुकीत उमेदवारी मिळवून लढण्याचा असून, हे सर्व राजकीय वारस त्यादृष्टीने प्रयत्नशील असले तरी यातील राजकारमात किती टिकतील हे येणारा काळच सांगणार आहे. विदर्भालाही घराणेशाहीची परंपरा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra assembly election in vidarbha

ताज्या बातम्या