मुंबई : राज्यपालांचे अभिभाषण शब्दांचा बाजार आणि आकड्यांची फेकाफेक होती. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना अभिभाषणात मात्र आनंदी आनंद गडे दिसला.
रस्ते आणि पूल बांधणे म्हणजे विकास नाही, या शब्दात काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) विधिमंडळ नेते जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचे वाभाडे काढले.
विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावर बुधवारी चर्चा झाली. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, गडचिरोली स्टील हब बनवण्याचा सरकारचा सकंल्प आहे. पण, तेथील २५ खाणींनी आदिवासींच्या संसाधनांची लूट चालवली आहे. दाओस परिषदेत प्राप्त झालेल्या पाच वर्षातील गुंतवणुकीमुळे राज्यात ५३ लाख रोजगार होणे अपेक्षीत होते. मात्र ‘पिरॉयडीकल लेबर फोर्स’च्या अलिकडच्या अहवालात राज्यातील बेरोजगाराीचा दर १३.१ असल्याचे नमूद आहे.
सकल देशांतर्गत उत्पन्नामध्ये राज्याचा १४ टक्के वाटा असल्याचे मागच्या वर्षीच्या अभिभाषणात नमूद होते. कालच्या अभिभाषणात राज्याचा वाटा १३.५ टक्के वाटा असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ राज्याची आर्थिक घसरण झाली आहे, असे राज्यपालांच्या अभिभाषणा मधून स्पष्ट होते. राज्यापालांच्या अभिभाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी एका शब्दाचाही उल्लेख नाही. राज्यातील कंत्राटदारांचे ७७ हजार कोटी थकले आहेत, असा आरोप पाटील यांनी केला.
निर्यातीच्या प्रोत्साहन अनुदानात कपात केल्याने कांदा निर्यात ठप्प आहे. परिणामी, कांद्याचे दर पडले आहेत. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी २५ हजार कोटींची तरतूद केली आहे. दुसरीकडे लाडक्या बहिणीचा हप्ता वाढवण्यास आणि शेतकरी कर्जमाफीस सरकारकडे पैस नाहीत. सरकारने बनवलेले व्हीजन डॉक्युमेंट आणि प्रत्यक्षातली स्थिती यामध्ये मोठे अंतर आहे, असे पाटील म्हणाले.
अर्थसंकल्पावरील दुसऱ्या दिवसाच्या चर्चेत सुनिल प्रभू, निलेेश राणे, अमीन पटेल, शेखर निकम, विनय कोरे, नमिता मुंदडा, दिलीप लांडे, वरुण सरदेसाई, चंद्रकांत नवघरे, अभिजीत पाटील, नितीन राऊत, अबु आजमी, सिद्धार्थ खरात, विश्वजीत कदम आदींनी भाग घेतला.
कंत्रटातील टक्केवारी वाढली – विजय वडेट्टीवार
औषध बनवणाऱ्या कंपन्यांना ‘दप्तर’ बनवण्याचे कंत्राट देऊन सरकार मर्जीतील लोकांचे खिसे भरत आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पशेजारील आणि नागपूर वनविभागाची वन्यप्राणी अधिवासाची जमीन उद्योगपतींच्या घशात घातली. १० कोटी वृक्ष लावण्याच्या गप्पा मारणारे सरकार प्रत्यक्षात जंगले साफ करत आहे. हवा, पाणी आणि जमीन विकण्याचे पाप हे सरकार करत आहे, असा आरोप काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केला.
शेतकरी आत्महत्या चालूच आहेत. शेतकऱ्यांना किडन्या विकाव्या लागत आहेत. मात्र अभिभाषणात शेतकरी ‘कर्जमुक्ती’चा साधा उल्लेखही नाही. राजभवनात बसून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करणाऱ्यांना या सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. केवळ राजकारणासाठी महापुरुषांची नावे सरकार वापरत आहे. अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

