बोलायला लागलं की ‘ईडी’ची विडी शिलगावतात; भुजबळांनी मोदी सरकारवर डागली टीकेची तोफ

काँग्रेसनं काय केलं सांगू नका; त्यांच्या लक्षात आलं तर तेही विकून टाकतील, अशी टीका भुजबळ यांनी कृषी विधेयकावर चर्चा करताना केंद्रावर केली.

Maharashtra Assembly session 2021 Updates, chhagan bhujbal, farms law agriculture law, modi govt
काँग्रेसनं काय केलं सांगू नका; त्यांच्या लक्षात आलं तर तेही विकून टाकतील, अशी टीका भुजबळ यांनी कृषी विधेयकावर चर्चा करताना केंद्रावर केली.

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोनल सुरूच आहे. हे आंदोलन सुरू असतानाच राज्य सरकारने पावसाळी अधिवेशानात केंद्राच्या कृषी कायद्यांना आव्हान देणारी तीन कृषी विधेयक विधानसभेत मांडली. या विधेयकावर चर्चा करताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला. शेतकरी आंदोलनासंदर्भातील केंद्राच्या भूमिकेवर टीका करताना “दोन-चार दिवसांचं आंदोलन किती त्रासदायक असतं. मग हे आंदोलन आठ महिन्यांपासून सुरू आहे. ते दुश्मन आहेत का, ते पाकिस्तानातून आले आहेत का?,” असा सवाल उपस्थित केला.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्यानंतर ठाकरे सरकारने तीन कृषी विधेयक विधानसभेत सादर केली. या विधेयकावर बोलताना अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले,”दिल्लीत लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. अख्ख्या जगाने याची नोंद घेतली. आंदोलनाच्या ठिकाणी करोनामुळे आणि इतर आजारांमुळे दगावले. एकाचा मृत्यू झाला, तरी आपण संवेदना व्यक्त करतो. पण, २०० पेक्षा जास्त बळी गेला. पण, दुर्दैव असं की, मंत्री यायचे, चर्चा करायचे आणि जायचे. शेतकऱ्यांनी भेटायला जायला म्हणून सांगितलं, तर शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकले गेले. याची नोंद जगाने घेतली. टीका झाल्यावर खिळे काढले.

“या देशात खायला अन्न नव्हतं. ते मी पाहिलेलं आहे. अमेरिकेतून येणारा लाल गहू पाहिला, खाल्ला. स्व. वसंतराव नाईकांनी घोषणा केली. त्यांनी कृषी क्रांती आणली. ती यूपीए सरकारपर्यंत सुरू राहिली. हमीभाव दुप्पट-तिप्पट वाढवून दिले. शेतकऱ्यांनी इतकं पिकवलं की, सव्वाशे कोटी देशवासीयांची भूक भागवून २५ देशांच्या अन्नाची गरज या देशाने भागवली,” असं भुजबळ म्हणाले.

हेही वाचा- “फक्त भुजबळ, देशमुखांचीच नावं घेतली; मीही त्यातलाच एक” म्हणत प्रताप सरनाईकांनी केली क्लीनचिटची मागणी!

“करोनात प्रत्येक जण सॅनिटायझर लावून काम करत होता. पण, शेतकऱ्यांनी कुटुंबासहित शेतात राबत होता. त्याने करोना पाहिला नाही, रोगराई बघितली नाही. त्याने अन्नधान्य पिकवलं. इतरांना आपण करोना योद्धे म्हणतो, शेतकरीही करोना योद्धाच आहे. पंतप्रधान मोफत धान्य पुरवतात, पण पिकवतो कोण… त्या शेतकऱ्याने काय गुन्हा केला. त्यांचं म्हणणं इतकंच होतं की हे कायदे अन्यायकारक आहेत. मग तरीही कायद्यांचा अट्टाहास का? अनेक उद्योगपतींनी तयारीही केली. आता हा सगळा कारभार एकदोन लोकांच्या हातात जाणार,” असं इशारा भुजबळांनी दिला.

हेही वाचा- “माझा फोन टॅप केला आणि नाव ठेवलं अमजद खान”, नाना पटोलेंचा सभागृहात गंभीर आरोप!

“शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला म्हणून इतकं उत्पादन होत आहे. संवेदना कुठे गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेप केला. दोन-चार दिवसांचं आंदोलन किती त्रासदायक असतं. हे आंदोलन आठ महिन्यांपासून सुरू आहे. ते दुश्मन आहेत का, ते पाकिस्तानातून आले आहेत का? कायदे करताना विरोध होतो, त्यावेळी लोकांना काय हवंय ते लक्षात घेतो; कायदे मागे घेतो. पण इथे बोलायलं गेलं, तर शेतमाला विका… हे विका, ते विका… काय करायचं, कशाचीही चर्चा नाही. मी तर म्हणेन बाळासाहेब (बाळासाहेब) कुणी विचारलं काँग्रेसनं केलं, तर सांगू नका. कारण काँग्रेसनं काय केलं हे सांगितलं तर त्यांच्या लक्षात नसेल आणि लक्षात आल्यामुळे तेही विकतील. बोलायचं काय… बोलायला लागलं की ईडीची विडी शिलगावतात… कारण कायदेच तसे आहेत. काहीही आरोप करायचे. आरोप सिद्ध करणारा कुठे तर तुरुंगात, कसे आरोप सिद्ध करायचे? ही लोकशाही आहे. किती वेळ लागेल शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना घरी पाठवायला,” असा सवाल छगन भुजबळ यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra assembly session 2021 updates chhagan bhujbal farms law agriculture law modi govt bmh