महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आरोप-प्रत्यारोपांची पेटती भट्टीच म्हणता येईल. कारण विरोधक आरोप करतात, सरकार उत्तर देतं. कधी सरकार भूमिका मांडतं आणि विरोधक शांत होतात. अशा या खडाजंगी पाहिल्या जाणाऱ्या विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा विषय निघाला आणि एकच हशा पिकला. सभागृहातले सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरचे आमदार खळखळून हसले. एवढंच काय आदित्य ठाकरेही मनमुरादपणे हसताना दिसले.
नेमकं काय घडलं?
आमदार बच्चू बोलायला उभे राहिले. त्यांनी कामगारांचा प्रश्न मांडत असताना म्हणाले की राज्यभरात २५ ते ३० टक्के प्रकल्प बाद होतात. त्यामुळे कामगार रस्त्यावर येतात. हे होऊ नये म्हणून आपण काही धोरण आखलं पाहिजे की नाही? एखादा मोठा प्रकल्प होतो तेव्हा कामगार गाव सोडून येतात. प्रकल्प बंद पडल्यावर तो कामगार कुटुंबासह रस्त्यावर येतो. हे टाळण्यासाठी उपाय योजना आवश्यक आहे. लग्न कामगार आहे म्हणून केलं, आता लग्न तुटलं कोण जबाबदार आहे याला? असा प्रश्न बच्चू कडूंनी विचारला. सरकारने जबाबदारी घ्यावी असंही बच्चू कडू म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी काय दिलं उत्तर?
“अध्यक्ष महोदय लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची आहे, तुटलं तर त्याला सांभाळण्याची जबाबदारीही सरकारची आहे. आपण जी सूचना केली आहे ती जरूर तपासून पाहू.त्यासंदर्भात धोरण तयार करता येईल का आपण पाहू” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि खाली बसले. त्यानंतर आदित्य ठाकरे उभे राहिले.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
अध्यक्ष महोदय या विषयावर “मी थोडा स्कोप वाढवू इच्छितो. फ्लॅश पॉलिसीचा उल्लेख मंत्रिमहोदयांनी केला. काही ठिकाणी अॅश डंपिंग सुरू झालं आहे. ती राख शेतकऱ्यांच्या शेतात जाऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत त्यावर सरकारने उत्तर द्यावं. दुसरा प्रश्न असा आहे की जे अॅश पाँड आहेत ते अशास्त्रीय दृष्ट्या तयार करण्यात आले आहेत. त्याचं लायनिंग वगैरे नाही. ७०० ते ८०० एकर ची जागा आहे तिथे सौर उर्जेवरचा प्रकल्प सुरू करणार आहोत का? काही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेतले गेले पाहिजेत” अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आदित्य ठाकरेंना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस उभे राहिले आणि म्हणाले, “पहिल्यांदा तर माननीय बच्चू कडूंनी प्रश्न आदित्य ठाकरेंकडे पाहून विचारला होता का? सरकारने लग्न लावायचं. सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे.”
यावर लगेच आदित्य ठाकरे उभे राहिले आणि म्हणाले की, “ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का? लग्न लावून देऊ किंवा आमच्यासोबत बसा “
त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणाचंही तोंड बंद कसं करायचं याचा उत्तम उपाय म्हणजे लग्न. मी अनुभवावरूनच बोलतो आहे. सन्मानीय आदित्य ठाकरेंनी मांडलेले विषय महत्त्वाचे आहेत त्याची दखल आम्ही घेऊ. त्यांच्या सूचना योग्यच आहेत. अॅश मोठ्या प्रमाणावर तयार होते त्याच्या वाहतुकीला आम्ही परवानगी देत आहोत” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पण सरकार लग्नाची जबाबदारी घेईल असं जेव्हा फडणवीस म्हणाले तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला.