Maharashtra Assembly: एकनाथ शिंदेंनी पहिली लढाई जिंकली, उद्या महत्वाची परीक्षा; सकाळी ११ वाजता बहुमत चाचणी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले

Maharashtra Assembly: एकनाथ शिंदेंनी पहिली लढाई जिंकली, उद्या महत्वाची परीक्षा; सकाळी ११ वाजता बहुमत चाचणी
राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार करत सहजपणे अध्यक्षपद जिंकलं

Maharashtra Assembly Speaker Election Live, 03 July 2022: विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार करत सहजपणे अध्यक्षपद जिंकलं. आधी आवाजी मतदान आणि नंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली. राहुल नार्वेकर यांनी १६४, तर शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. यानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि भाजपाने पहिली लढाई जिंकली आहे. आता उद्या म्हणजेच सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे.

सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. सोमवारी विश्वासदर्शक जाईल.

Live Updates

भाजपाचे राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष, १६४ मतांनी विजयी; शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतं

15:10 (IST) 3 Jul 2022
शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; व्हीपविरोधात मतदान केल्याचा आरोप

शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपविरोधात मतदान करणाऱ्या १६ आमदारांविरोधात (ठाकरे गटातील) तक्रार दाखल केली आहे. शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिण्यात आले आहे. अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात भरत गोगावले यांचा शिवसेनेचे प्रतोद असा उल्लेख करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष यांनी भरत गोगावले यांच्या पत्राचं अधिवेशनादरम्यान वाचन केलं.

सविस्तर बातमी

14:51 (IST) 3 Jul 2022
बंडखोर आमदारांचे निलंबन होणार – जयंत पाटील

बंडखोर आमदारांचे निलंबन होणार आहे. यासाठी दोन तीन महिन्यांचा वेळ लागेल. विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा होणार आहे. त्यासंदर्भात योग्य तो निर्णय शरद पवार घेतील, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी दिले.

14:43 (IST) 3 Jul 2022
३९ आमदारांनी व्हीप न पाळल्यामुळे राजन साळवींचा पराभव – सुनील प्रभू

“विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ३९ आमदारांनी व्हीप न पाळल्यामुळे राजन साळवी यांचा पराभव झाला. उपाध्यक्ष असताना निवडणूक झाली आणि त्याच वेळी आम्ही पत्र दिले आहे. त्यानंतर भरत गोगावलेंनी नव्या अध्यक्षांना पत्र दिल्याने मला वाटत नाही की त्या पत्राला काही अर्थ असेल,” असे सुनील प्रभू म्हणाले.

14:16 (IST) 3 Jul 2022
पळालेल्या आमदारांनी डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत केली नाही – आदित्य ठाकरे

बंडखोर आमदारांनी व्हीप मोडलेला आहे आणि उपाध्यक्षांकडे याचा विरोध केला आहे. एकाही पळालेल्या आमदाराने डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत केली नाही. सगळे डोळे चोरून खाली किंवा दुसरीकडे बघत होते. आज त्यांनी आमच्याकडे पाहिले नाही पण मतदारांकडे गेल्यानंतर काय सांगणार? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

14:08 (IST) 3 Jul 2022
एकनाथ शिंदेंनी पहिली लढाई जिंकली, उद्या सकाळी ११ वाजता बहुमत चाचणी

कामकाजाच्या शेवटी शोकप्रस्ताव मांडण्यात आलं. नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. आजच्या दिवसाचं कामकाज संपलं आहे. आता उद्या सकाळी ११ वाजता विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून सरकारची मुख्य परीक्षा असणार आहे. राहुल नार्वेकर यांच्या निमित्ताने सरकारने पहिली लढाई जिंकली आहे.

14:00 (IST) 3 Jul 2022
जावयाची काळजी घ्या; राहुल नार्वेकरांचा जयंत पाटील, अजित पवारांना सल्ला

मी जावई असल्याचं सांगत अजित पवार, जयंत पाटील यांनी काळजी घेण्यास सांगितलं. पण त्यांनीही जावयाची काळजी घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे योग्य सहकार्य मिळेल यात शंका नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले.

गेल्या काही दिवसात अनेक धक्के, भूकंप आले. त्यातील एक धक्का मलाही मिळाला. माझी निवड झाली असं सांगत त्यांनी पक्षाचे आभार मानले.

13:53 (IST) 3 Jul 2022
राहुल नार्वेकर यांनी मानले आभार

राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित सर्वांचे आभार मानले. महत्वाची विधायके चर्चेविना पारित केले जाणार नाहीत असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. तसंच नियमांचं पालन केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. याच सभागृहात चार माजी विधानसभा अध्यक्ष असल्याने हे माझं भाग्य असल्याचंही ते म्हणाले आहेत.

13:52 (IST) 3 Jul 2022
शिंदे गटाकडून १६ सदस्यांविरोधात तक्रार

शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपविरोधात मतदान करणाऱ्या १६ आमदारांविरोधात तक्रार केली आहे. शिवसेनेचे प्रतोद असा त्यांचा उल्लेख करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष यांनी भरत गोगावले यांच्या पत्राचं वाचन केलं.

13:52 (IST) 3 Jul 2022
“…म्हणून विश्वनाथ आनंद अमित शाहांसोबत बुद्धीबळ खेळत नाही”; भुजबळांनी मेसेज वाचून दाखवताच सभागृहात हशा

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोबाईलवरील एक मेसेज वाचून दाखवत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. या टोलेबाजीनंतर सभागृहात एकच हशा पिकला.

सविस्तर वाचा

13:46 (IST) 3 Jul 2022
धनंजय मुंडे यांनी चुकून मिलिंद नार्वेकर उल्लेख केला

धनंजय मुंडे यांनी चुकून मिलिंद नार्वेकर उल्लेख केला असता यावेळी इतर सदस्यांनी रोखलं. यानंतर एकच हशा पिकला. यानंतर सुनील प्रभू यांनी हे नाव रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची मागणी केली. “कोणतंही विधेयक चर्चेविना पारित केलं जाऊ नये. सर्वांना त्यावर बोलण्यासाठी वेळ दिला जावा,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

13:42 (IST) 3 Jul 2022
सर्वच मुस्लिमांना औरंगजेबाचं नाव मान्य नाही – हरिभाऊ बागडे

पहिल्या रांगेतील सदस्य बोलण्यासाठी फार वेळ घेत असल्याने मागे बसणाऱ्यांना संधी मिळत नाही अशी खंत हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली. संभाजीराजेंचे हाल करत मारणाऱ्याचं नाव शहराला मान्य नाही असं सांगत त्यांनी अबू आझमींना उत्तर दिलं. सर्वच मुस्लिमांना औरंगजेबाचं नाव मान्य नाही. अनेक मुस्लिम मुलांचं नाव औरंगजेब ठेवत नाहीत असं हरिभाऊ बागडे म्हणाले.

13:38 (IST) 3 Jul 2022
आम्हीदेखील व्हीपचा उल्लेख करु शकलो असतो, केसरकरांनी सुनावलं

हे अभिनंदनाचं भाषण असल्याने राजकीय भाष्य करायचं नसतं. मगाशी येथे व्हीपचा उल्लेख झाला. आम्हीदेखील व्हीपचा उल्लेख करु शकलो असतो. आम्हीदेखील अपात्रतेची कारवाई करु शकतो. पण आज आम्हाला त्यावर बोलायचं नाही आहे असं सांगत दीपक केसरकर यांनी सुनील प्रभू यांच्यावर टीका केली आहे.

13:34 (IST) 3 Jul 2022
राजकारणाची पातळी खूप खालावत चालली आहे – आदित्य ठाकरे

एक तरुण व्यक्ती महत्वाच्या स्थानी बसली आहे याचा आनंद आहे. राजकारणाची पातळी खूप खालावत चालली आहे. किती तरुणांना राजकारणात उतरावंसं वाटेल असं मी म्हणत असतो. तुम्ही हा विचार बदलला अशी आशा आहे. प्रत्येकाचा आवाज आपण ऐकावा अशी आशा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

13:32 (IST) 3 Jul 2022
आदित्य ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख करत करुन दिली आठवण

सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना कानात सांगण्यास सांगितलं. आम्ही फडणवीसांच्या कानात सांगितलं तसं झालं असतं तर आज वेगळी परिस्थिती असती असं सांगत आदित्य ठाकरेंनी टीका केली.

13:30 (IST) 3 Jul 2022
“मला एका गोष्टीचं खूप कौतुक, राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर…”; अजित पवारांच्या टोलेबाजीवर एकच हशा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी विधानसभा अधिवेशनात नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी बोलताना जोरदार टोलेबाजी केली. “राहुल नार्वेकर फार हुशार आहेत. त्यांच्याविषयी मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच नार्वेकरांचं कायद्याचं ज्ञान चांगलं आहे. अशा लोकांवर आम्ही देखील लक्ष ठेवून असतो, असं नमूद केलं. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

सविस्तर बातमी…

13:24 (IST) 3 Jul 2022
जावई असल्याने आम्हाला योग्य न्याय मिळेल, जयंत पाटलांचं मिश्कील भाष्य

अध्यक्षांचा आदर व्हावा यासाठी आपण काही यंत्रणा आणली पाहिजे. सदस्याला पूर्ण बोलू द्यावं यासाठीही प्रयत्न करणं गरजेचं आहे. एखादा सदस्य व्यक्त झाल्यावर बोलण्याची संधी असते असं जयंत पाटील म्हणाले.

“आमचे जावई असल्याने आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी आशा आहे. नाही तर संध्याकाळी आमच्या घरी मुलीला काय केलं ते कळवू. मग संध्याकाळी आपला समाचार घेण्याची विनंती करु,” असं मिश्कीलपणे जयंत पाटील म्हणाले.

13:17 (IST) 3 Jul 2022
“अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर आमच्या कानात सांगा”

अजित पवार म्हणाले मुख्यमंत्री बनण्याविषयी माझ्या कानात सांगितलं असत तर आम्ही मुख्यमंत्री केलं असत. अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर मी सांगतोय येऊन आमच्या कानात सांगा असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. जयंत पाटील यांच्या कानात मात्र सांगू नका असंही ते मिश्कीलपणे म्हणाले.

13:16 (IST) 3 Jul 2022
आदित्य ठाकरे गुरुदक्षिणा देऊ शकतील, मुनगंटीवारांचा टोला

“या सभागृहाचं कामकाज उत्तम होण्यासाठी आदित्य ठाकरे गुरुदक्षिणा देऊ शकतील. उरलेले इतरही देतील,” असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. “राहुल गांधींचा आदेश आला की तुम्ही झोपता पण या राहुल गांधींचं ऐकाल अशी आशा असल्याचंही ते म्हणाले. जावई हा देवासमान असतो ही आपल्या शास्त्रातील भावना आहे. त्यामुळे वरील सभागृहात काही अडणार नाही असा मला विश्वास आहे,” असं सुधीर मुंनगंटीवार म्हणाले आहेत.

13:10 (IST) 3 Jul 2022
मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही – भास्कर जाधवांचा आक्षेप

भास्कर जाधव यांनी अबू आझमी यांच्यावर आक्षेप घेतला आणि मुस्लिमांची नावं काढली जात आहे या वाक्याला विरोध केला. औरंगजेब अतिरेकी होता, त्याने आमच्यावर अत्याचार केला म्हणून नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे. मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही इतकंच सांगायचं आहे असं ते म्हणाले.

13:05 (IST) 3 Jul 2022
शहरांची नावं बदलून काय होणार आहे? अबू आझमींची विचारणा

शहरांची नावं बदलून काय होणार आहे? बाळासाहेबांच्या नावे मोठी शहरं बनवा, आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करु. मुस्लिमांची नावं असलेल्या शहरांची नावं बदलून काय उदाहरण दिलं जात आहे? अशी विचारणा अबू आझमी यांनी केली आहे.

13:00 (IST) 3 Jul 2022
३९ सदस्यांनी विरोधात मतदान करत लोकशाहीची पायमल्ली केली – सुनील प्रभू

आपण अध्यक्ष होत असताना सदनात आमचा व्हीप जुगारुन ३९ सदस्यांनी विरोधात मतदान करत लोकशाहीची पायमल्ली केली हे इतिहास विसरणार नाही. ही खंत १३ कोटी जनतेच्या मनात असेल असं सांगत सुनील प्रभू यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

12:57 (IST) 3 Jul 2022
मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो ते उपमुख्यमंत्री झाले – सुनील प्रभू

१०-१५ दिवसांपूर्वी सत्तेचे वारे वाहू लागले तुम्ही कायदेमंत्री व्हाल असं वाटलं होतं. या राज्यात काहीही घडू शकतं. ज्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो ते उपमुख्यमंत्री झाले. आमचं दु:ख विसरुन फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचं दु:ख वाटू लागलं असं सुनील प्रभू म्हणाले आहेत.

12:54 (IST) 3 Jul 2022
फडणवीसजी तुमचं अभिनंदन कसं करावं?, बाळासाहेब थोरातांची विचारणा

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. आता फडणवीस तुमचं अभिनंदन कसं करावं असा प्रश्न पडला आहे. भुजबळांनी उल्लेख केलेल्या बुद्धिबळाच्या खेळाकडे तुमचंच लक्ष नव्हतं असं वाटत आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

12:50 (IST) 3 Jul 2022
तुम्ही काँग्रेस का बाजूला ठेवली? बाळासाहेब थोरात यांचा मिश्किल प्रश्न

तुमची आदित्य ठाकरेंशी जवळीक होती. अजित पवारांना त्यांच्यासोबत असणारं नातं सांगितलं. पण मग तुम्ही काँग्रेसच का बाजूला ठेवली का असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी विचारला. फडणवीस एका दगडात किती पक्षी मारले? असा प्रश्नही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी विचारला.

12:49 (IST) 3 Jul 2022
विश्वनाथन यांचा अमित शाहांसोबत खेळण्यास नकार; भुजबळांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक मेसेज वाचून दाखवत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. जगातील सर्व खेळाडूंचा पराभव करणारे विश्वनाथन यांनी अमित शाह यांच्यासोबत खेळण्यास नकार दिला असल्याचं भुजबळ म्हणाले.

12:44 (IST) 3 Jul 2022
“एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं ”

फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेते रडू लागले. गिरीश महाजन तर डोक्यावरचा फेटा डोळ्यावर बांधून अश्रू पुसत आहेत. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं असंही अजित पवार म्हणाले.

12:42 (IST) 3 Jul 2022
भाजपात मूळचे लोक कमी, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

“याआधी सत्ताधारी आणि आता विरोधी बाकावरुन पाहिलं तरी समोर मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्तच पहायला मिळत आहेत. ते पाहून मूळच्या भाजपाच्या लोकांचं वाईट वाटतं.पहिली लाईन पाहिली तरी लक्षात येईल. दिपक केसरकर तर आता कसले प्रवक्ते झाले आहेत. आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही,” असा टोला अजित पवार यांनी लगावला.

12:36 (IST) 3 Jul 2022
राहुल नार्वेकर कुठेही गेले तरी पक्षाच्या नेतृत्वाला फार जवळ करतात – अजित पवारांचा टोला

“राहुल नार्वेकर कुठेही गेले तरी पक्षाच्या नेतृत्वाला फार जवळ करतात. शिवसेनेत गेल्यानंतर आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीत मला आणि भाजपात गेल्यानंतर फडणवीसांना जवळ केले. आता एकनाथ शिंदे तुम्हीही जवळ करा, नाहीतर काही खरं नाही,” असं मिश्किल भाष्य अजित पवारांनी केलं.

12:35 (IST) 3 Jul 2022
आपले अध्यक्ष फार हुशार आहेत, अजित पवारांनी सांगितली आठवण

“राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी केला आहे. तुमच्याकडूनही तीच अपेक्षा आहे. तुमच्या रुपाने एक अभ्यासू, तरुण नेतृत्व सभागृहाला मिळालं आहे. मुंबई, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर आपलं प्रभुत्व आहे. आदित्य ठाकरेंसोबतही तुम्ही काम केलं. मला मावळमध्ये उमेदवार हवा होता तेव्हा मी तुम्हाला विनंती केली. मोदी लाटेत राहुल नार्वेकर यांचा पराभव झाला. पण ते फार हुशार आहेत, माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा असं सांगितलं होतं,” असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

12:30 (IST) 3 Jul 2022
अजित पवारांकडून अभिनंदन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले की, “आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी न्याय देण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्राच्या विकासाची कामं गतिमान होतील सभागृहाची अपेक्षा आहे. आपलं नाव जोडलं गेलं आहे हा मोठा सन्मान आणि जबाबदारी आहे”.

12:24 (IST) 3 Jul 2022
जावई आणि सासऱ्याचं एकमत होत नाही, फडणवीसांचं मिश्किल भाष्य

योगायोग म्हणजे राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष असून त्यांचे सासरे निंबाळकर विधानपरिषदेचे सभापती आहेत. जावई आणि सासऱ्याचं एकमत होत नाही असं म्हणतात असं मिश्किलपणे फडणवीस यावेळी म्हणाले.

12:19 (IST) 3 Jul 2022
महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

आज महाराष्ट्राने नवा रेकॉर्ड केला आहे. राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. हे कायदेमंडळ असून वेगवेगळे कायदे करतो. प्रत्येकाचा विचार, आशा, अपेक्षा या सभागृहात सदस्यांच्या माध्यमातून मांडल्या जातात. त्या सोडवण्याची क्षमता या सभागृहात आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

12:17 (IST) 3 Jul 2022
झुकतं माप द्यावं अशी इच्छा नाही – एकनाथ शिंदे

न्यायदान करताना कायद्यापुढे सर्व समान याप्रणामेच निर्णय होतील अशी आशा आहे. आम्ही सत्ताधारी बाकावर असलो तरी झुकतं माप द्यावं अशी इच्छा नाही. पारदर्शक पद्धतीने आम्हाला कारभार चालवायचा आहे. आपण मार्गदर्शनदेखील करावं अशी आशा आहे. तरुण आमदारांच्या चिंता दूर करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

12:16 (IST) 3 Jul 2022
झुकतं माप द्यावं अशी इच्छा नाही – एकनाथ शिंदे

न्यायदान करताना कायद्यापुढे सर्व समान याप्रणामेच निर्णय होतील अशी आशा आहे. आम्ही सत्ताधारी बाकावर असलो तरी झुकतं माप द्यावं अशी इच्छा नाही. पारदर्शक पद्धतीने आम्हाला कारभार चालवायचा आहे. आपण मार्गदर्शनदेखील करावं अशी आशा आहे. तरुण आमदारांच्या चिंता दूर करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

12:16 (IST) 3 Jul 2022
राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झालं आहे – एकनाथ शिंदे

राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झालं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार, भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आतापर्यंत ज्या घटना घडल्या त्याची देशाने नोंद घेतली आहे. मी नगरविकास मंत्री होतो आणि माझ्यासोबत ८ मंत्री पायउतार झाले. एकीकडे सत्ता, मोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा सैनिक होता. पण ५० विधानसभा सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला हे आमचे भाग्य आहे. एका आमदाराला मी स्वत: चार्टर्ड विमानाने पाठवलं. त्यामुळे कोणावरही जबरदस्ती झालेली नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

12:07 (IST) 3 Jul 2022
एकनाथ शिंदेंकडून अभिनंदनाचा प्रस्ताव

विधानभवन लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. अध्यक्षांची उच्च परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अनेकांना यानंतर मोठी संधी प्राप्त झाली आहे. देशपातळीवरही त्यांना गौरवण्यात आलं आहे. सर्वोच्च पदावर विराजमान होत असताना फक्त राज्यातील नव्हे तर देशातील आणि परदेशातील लोक हा ऐतिहासिक क्षण डोळे भरुन अनुभवत आहेत. कालपर्यंत आपण कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होतात. पण आता व्यक्तिमत्वाला या न्यायालयातील शिरपेच मिळाला आहे. या पदाचा, मान, सन्मान, दर्जा मोठा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

12:02 (IST) 3 Jul 2022
सभागृहात ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’च्या घोषणा

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानतंर सभागृहात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेलं.

11:59 (IST) 3 Jul 2022
राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याचं उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केलं आहे.

11:58 (IST) 3 Jul 2022
समाजवादी पक्ष आणि एमआयएम तटस्थ

समाजवादी पक्षाचे दोन आमदार आणि एमआयएमचा एक आमदार तटस्थ राहिले आहेत. राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली आहेत. राहुल नार्वेकर विजयी झाले असून विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे.

11:55 (IST) 3 Jul 2022
राजन साळवी यांना १०७ मतं

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना एकूण १०७ मतं मिळाली आहेत. १०० मतं पूर्ण झाल्यानंतर टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आलं. तीन आमदार तटस्थ राहिले असून यामध्ये समाजवादी पक्ष आणि एमआयएमचा समावेश आहे.

11:48 (IST) 3 Jul 2022
कैलास किसनराव गोरंट्याल यांचा शायरीतून टोला

आमदार कैलास किसनराव गोरंट्याल यांनी प्रत्यक्ष मतदान करताना “ऐसे वैसे कैसे कैसे हो गये. और कैसे कैसे ऐसे वैसे हो गये” अशी शायरी म्हणत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.

11:40 (IST) 3 Jul 2022
राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. राहुल नार्वेकर यांनी १६४ मतं मिळाली आहेत. मनसेचे राजू पाटील तसंच बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनीदेखील राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केलं आहे.

11:18 (IST) 3 Jul 2022
देवेंद्र फडणवीसांनी घेतला आक्षेप

सभागृहात प्रत्यक्ष मतमोजणी सुरु असताना काही सदस्य गोंधळ घालत आहेत. काही सदस्य आसन क्रमांक सांगत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. यावर जयंत पाटील यांनीदेखील उभं राहून प्रक्रिया व्यवस्थित राबवण्यास सांगितलं.

11:14 (IST) 3 Jul 2022
विधानसभेत निवडणुकीला सुरुवात

विधानसभेत निवडणुकीला सुरुवात झाली आहे. राहुल नार्वेकर आणि राजन साळवींच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर राजन साळवींसाठी थोपटेंनी प्रस्ताव मांडला. आवाजी मतदानानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे.

11:05 (IST) 3 Jul 2022
…तर एकनाथ शिंदेंनी हे आधीच केलं असतं, जयंत पाटील यांचा टोला

मला सर्वात प्रथम राज्यपालांचे आभार मानायचे आहेत. गेले अनेक महिने महाराष्ट्राच्या विधानसभेला याची प्रतिक्षा होती. वारंवार आम्ही विनंती करुनही त्यांनी निवडणूक लावली नाही. ते कशाची वाट पाहत होतो हे आमच्या लक्षात आलं. हे आधीच सांगितलं असतं तर एकनाथ शिंदेंनी हे आधीच केलं असतं. राज्यपालांनी देशाला आदर्श घालून दिला आहे. आता त्यांनी १२ आमदारांची पाठवलेली यादी तात्काळ मान्य करावी असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

यावर देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यामुळे हा दिवस पहायला मिळाला. मित्र म्हणून ते जागले आहेत असं सांगत प्रत्युत्तर दिलं आणि आभार मानले.

10:49 (IST) 3 Jul 2022
शिवसेना विधानभवन कार्यालय आम्हीच सील केलं – आदित्य ठाकरे

विधानभवनातील शिवसेना विधानभवन कार्यालय आम्हीच सील केलं आहे. त्याची चावी आमच्याकडेच आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

10:43 (IST) 3 Jul 2022
कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त लावण्यात आला नव्हता, आदित्य ठाकरेंची टीका

इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कसाबच्या वेळीदेखील इतका बंदोबस्त लावण्यात आला नव्हता. बसमधून आणलेल्या आमदारांचं मला वाईट वाटतं, कसाबलाही असं आणलं नसेल. कोणी पळणार आहे का? अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचंच व्हीप अधिकृत आहे असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

“आम्हाला धोका दिला ठीक आहे, पण मुंबईकरांना धोका देऊ नका,” असंही आवाहन त्यांनी आरे कारशेडचा उल्लेख करत म्हटलं. आम्हीच कार्यालय सील केल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी यावेळी दिली.

10:38 (IST) 3 Jul 2022
एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसहित विधानभवनात दाखल

एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसहित विधानभवनात दाखल झाले आहेत. विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकारी, मान्यवरांसह अभिवादन केले.

10:36 (IST) 3 Jul 2022
सत्ताकेंद्रातील सासरे आणि जावयाची जोडी

शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे पिता-पुत्र किंवा वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या काका-पुतण्याच्या जोडीने राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. आता विधान परिषद आणि विधानसभेचे पीठासीन अधिकारीपद हे सासरे आणि जावयाकडे जाणार आहे. पिता-पुत्र, काका-पुतणे यानंतर सासरे आणि जावयाची जोडी राज्याच्या सत्ताकेंद्रात बघायला मिळणार आहे.

सविस्तर बातमी

10:35 (IST) 3 Jul 2022
महाराष्ट्रात दंडुकशाहीचा वापर करु नका – नाना पटोले

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार यांनी आमच्यामागे महाशक्ती असल्याचं सांगितलं आहे. राज्यपालांवर आम्ही जो संशय व्यक्त केली होता तो खरा ठरला आहे. आम्ही निवडणूक मागत असताना न्यायव्यवस्थेत असल्याने कारवाई करता येणार नाही सांगत होते. राज्यपालांनी निवडणूक लावली आहे त्यावरुन कोणती महाशक्ती आहे हे समजत आहे. हुकूशमाही आणि दडपशाही सुरु असून त्याचा वापर विधानसभेत होऊ नये अशी आग्रही विनंती आहे. अन्यथा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासला जाऊ शकतो असं आमचं म्हणणं आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

(Express Photo by Amit Chakravarty)

दोन दिवसांच्या अधिवेशनात शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये वादावादी किंवा बाचाबाची होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. विधान भवनाच्या आसपास दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विधान भवनात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही.

Next Story
Maharashtra Assembly Session विधानसभा विशेष अधिवेशनाच्या कामकाजाचे स्वरुप; बहुमत चाचणी, अध्यक्षांची निवड आणि बरचं काही
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी