scorecardresearch

निकालानंतर राज ठाकरेंचे मौन, ११० पैकी फक्त एका जागेवर मनसे विजयी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र मौन बाळगले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाला अपेक्षित यश मिळाले नसले तर पुन्हा युतीच सत्तेवर येईल हे स्पष्ट झाले आहे. निकालानंतर सर्वच प्रमुख नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र मौन बाळगले आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा फटका मनसेला बसला आहे.

ही निवडणूक एकतर्फी होईल काँग्रेस-राष्ट्रवादीचा अत्यंत दारुण पराभव होईल असे चित्र रंगवण्यात आले होते. पण प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीने बऱ्यापैकी यश मिळवले आहे. भले ते सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत नसले तरी आघाडीला ९५ पेक्षा जास्त जागांवर यश मिळाले आहे. लोकसभेचा विचार करता दोन्ही पक्षांना मिळालेले यश निश्चित उत्साहवर्धक आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला आलेली मरगळ झटकून कार्यकर्ते पुन्हा कामाला लागतील.

या तुलनेत राज ठाकरेंचा मनसे पक्ष कुठेच नाहीय. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळे मनसेला सक्षम विरोधी पक्ष बनवा अशी मागणी केली होती. पण राज्यातील जनतेने मनसेऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधक म्हणून बळकट बनवले. मनसेने एकूण ११० जागांवर निवडणूक लढवली. पण फक्त एका कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेला यश मिळाले. मनसेचे प्रमोद पाटील या मतदारसंघातून निवडून आले.

लोकसभा निवडणूक न लढवताही राज ठाकरे यांच्या प्रचारात जोर दिसला होता. विधानसभेच्या प्रचारात मात्र तितका उत्साह दिसला नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे राज ठाकरेंनी निवडणूक रिंगणात उडी घेतली. पण मनसेला कुठेही लक्षणीय यश मिळाले नाही. नाशिक, पुणे, मुंबई शहरी पट्टयात मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे. पण इथेही मनसे उमेदवार विजयी पताका फडकवू शकले नाहीत. परिणामी राज ठाकरे यांनी आता मौन धारण केले आहे. मनसेच्या फेसबुक किंवा टि्वटक अकाऊंटवरुन त्यांनी कुठलेही भाष्य केलेले नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2019 result mns raj thackeray silence dmp

ताज्या बातम्या