scorecardresearch

“लोकशाहीचे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”; तिसऱ्या दिवशी भाजपाचा आक्रमक पवित्रा

विधानभवनामध्ये प्रवेश करण्याआधीच भाजपाच्या दोन प्रमुख नेत्यांनी आज पक्षाची सभागृहामधील भूमिका काय असेल याची माहिती दिली

“लोकशाहीचे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”; तिसऱ्या दिवशी भाजपाचा आक्रमक पवित्रा
आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे

हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवात होण्याआधीच भाजपाकडून आज कोणत्या विषयांवरुन चर्चा केली जाणार आहे यासंदर्भातील स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत. आज विधानभवनामध्ये प्रवेश करण्याआधी या दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी अधिवेशनाच्या कालावधी वाढवून घेण्याचे भाजपाचे प्रयत्न असतील असं म्हटलंय. याच मुद्द्यावरुन मुनगंटीवर यांनी सत्ताधाऱ्यांना टोलाही लगावलाय.

साधारणतः हे लोकशाहीच मंदीर आहे लोकशाहीचा अनादर दाखवण्याचा काम कोणीही दाखवू नये, असं म्हणत मुनगंटीवार यांनी आजचं कामकाज सुरळीत चालावं अशी अपेक्षा व्यक्त केली. “आज बघितले तर महाराष्ट्राच्या समोर २०० प्रश्न आहेत. आरोग्य सेवेचा भ्रष्टाचार आहे. कामगार, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. यावर चर्चा करण्याची एक जागा आहे, ती म्हणजे विधानभवन. त्यामुळे चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी आमची आग्रही मागणी राहील,” असं मुनगंटीवार म्हणाले.

“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर अधिवेशन संपवतील,” असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. “आमची मागणी असेल की एक आठवडा अधिवेशन वाढवावे. जनतेचे प्रश्न अनेक आहेत ते मांडायचे आहेत त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी सरकारने वाढवावा,” असं मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी, पुरवणी मागण्या मंजूर करून घेणे, विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणे यामध्ये सरकारला रस आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे अजून मिळायची आहेत, तेव्हा अधिवेशनचा कालावधी वाढवण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं. आज सभागृहामध्ये पेपर फूटी विषयावर विरोधक म्हणुन आक्रमक भुमिका घेणार आहोत .सगळे विषय सविस्तर मांडू, असंही पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-12-2021 at 10:46 IST

संबंधित बातम्या