मुंबई : राज्य शासनाने देशी व विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कामध्ये तीन ते चारपट वाढ केल्याने मद्यप्रेमींनी आपला मोर्चा नव्याने बाजारात आलेल्या व स्वस्त असलेल्या महाराष्ट्र मद्याकडे आणि बीअर कडे वळवला आहे. परिणामी, संपलेल्या आर्थिक वर्षात राज्यातील बीअरच्या खपाने विक्रम प्रस्थापीत केला असून बीअर हे राज्याचे पसंतीचे मद्य ठरले आहे.

युरोपमध्ये वाईन, पूर्वेकडील देशात बीअरला पसंती असली तरी भारतात हार्ड ड्रींकला (आयएमएफएल) मागणी राहिली आहे. भारतात बीअरचा खप मुख्यत्वे किनारी भागात आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत देशी (कंट्री लिकर) सर्वाधिक खपाचे मद्य राहिलेले आहे. मात्र उत्पादन शुल्क विभागाने जूनमध्ये विदेशी आणि देशीवर मोठे उत्पादन शुल्क लादले. दरम्यान महाराष्ट्र मद्यश्रेणी या नव्या मद्य वर्गाच्या उत्पादनास परवाने दिली. देशी व विदेशी दोन्ही महाग झाल्याने मद्यप्रेमींनी देशी व विदेशीच्या मधल्या किंमतीत असलेल्या महाराष्ट्र मद्य श्रेणी आणि बीअरकडे मोर्चा वळवला आहे.

परिणामी वर्ष २०२५ मध्ये ३२ कोटी लिटर खप असलेले विदेशी मद्य यंदा २७ कोटी लिटरवर घसरले. तुलनेत ३८ कोटी लिटर खप असलेली बीअर यंदा ४६ कोटी लिटरवर पोचली. उन्हाळ्यात बीअरचा ६ टक्क्यांनी खप वाढतो. पण, गेल्या ११ महिन्यात बीअरच्या खपाचे आकडे वाढतच गेले आहेत. नव्याने आलेल्या महाराष्ट्र मद्य श्रेणीचा १ कोेटी ८६ लाख लिटर खप झाला आहे.

मद्य प्रेमींनी स्वस्त मद्याला पसंती दिल्याने देशीला (सीएल ) किंचीत फटका बसला आहे. मागच्या वर्षी ४० कोटी लिटर खप झालेल्या देशीची यंदा ४२ कोटी लिटर विक्री अडली आहे. मद्यप्रेमींच्या या बदलत्या रुचीने राज्य शासनाच्या महसुलात मात्र भरघोस वाढ झाली आहे.

वर्ष २०२५ मध्ये चार प्रकारच्या मद्यावरील उत्पादन शुल्कामधून राज्याला २५ हजार ४६७ कोटी रुपये मिळाले होते. उत्पादन शुल्काच्या महसुलात वार्षिक ८ टक्के वाढ होते. पण यंदा १८ टक्के वाढ नोंदली असून हा आकडा २९ हजार ९५७ कोटी रुपयांवर पोचला आहे. राज्यात ११ बीअर उत्पादन घेणाऱ्या ब्रुअरी आहेत.

बीअरकडे मद्यप्रेमींचा वाढता कल दिलासा देणारी बाब मानली जाते. कारण विदेशी व देशीच्या तुलनेत तीव्र बीअरमध्ये ८ टक्के तर सौम्य बीअरमध्ये ५ टक्के अल्कोहोलची मात्रा असते. महसूल वाढीसाठी विभागाचे तत्कालीन मंत्री दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला उत्पादन शुल्क वाढीचा निर्णय फलदायी ठरला असून महसूल वृद्धीने विभागाची मान उंचावली आहे.

मार्च २०२५ ते मार्च २०२६ विक्री

१. देशी४२ कोटी ७० लाख लि.
२. विदेशी मद्य२७ कोटी ४० लाख लि.
३. महाराष्ट्र मद्य श्रेणी१ कोटी ८६ लाख लि.
४. वाईन१ कोटी ३० लाख लि.
५. बीअर४६ कोटी १३ लाख लि.