Bike Taxi Rules Maharashtra: मुंबई आणि महानगर क्षेत्रात बाईक टॅक्सीचा प्रश्न गंभीर बनला असून यामुळे शासनाला एक रुपयाचाही महसूल मिळत नसल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मान्य केले. विधानसभेत अवैध बाईक टॅक्सीचा प्रश्न चर्चेला आला असताना यावर विस्तृत चर्चा झाली. यापुढे बाईक टॅक्सीच्या सेवेला नियमात बसवून त्याद्वारे महसूल आणि राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

आमदार दिलीप लांडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, राज्यात बाईक टॅक्सी सेवेला परवानगी देत असताना मंत्रिमंडळाने केवळ ईव्ही बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. कारण पेट्रोल बाईक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आल्यास त्यामुळे प्रदूषण वाढण्याचा धोका होता.

ओला, उबेर, रॅपिडो या कंपन्यांना बाईक टॅक्सीसाठी तात्पुरता परवाना देण्यात आला होता. मात्र यापैकी एकाच कंपनीने तो परवाना घेतला. काही कालावधीनंतर आमच्या लक्षात आले की, या कंपन्यांनी सरसकट पेट्रोल आधारित बाईक टॅक्सी रस्त्यावर आणल्या होत्या. यानंतर आरटीओने अशा बाईकवर कारवाई केलेली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

चार ते साडे चार लाख अवैध बाईक टॅक्सी

प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, आजघडीला मुंबई आणि महानगर क्षेत्रात चार ते साडे चार लाख अवैध बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत आहेत. शासनाला एक रुपयाचाही महसूल या माध्यमातून मिळत नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक घेतली, त्यात काही निर्णय घेण्यात आले आहेत.

नवी नियमावली काय?

नव्या नियमांबाबत बोलताना प्रताम सरनाईक म्हणाले, “महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना रोजगार मिळावा, यासाठी बाईक टॅक्सीच्या नियमात बदल केले आहेत. यापुढे बाईक टॅक्सी चालवायची असेल तर प्रतिदिन पाच रुपये शासनाला द्यावे लागणार आहेत. तसेच प्रत्येक राईडमागे दोन टक्के रक्कम कापली जाईल, जी कल्याणकारी योजनांसाठी वापरली जाईल.”

“जे लोक बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सी चालवत आहेत, त्यांनाही चाप लावला जाणार आहे. यापुढे अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र असलेल्यांना बाईक टॅक्सी चालविण्याची परवानगी देण्यात येईल. यामुळे अवैध वाहतुकीला लगाम लागेल, तसेच शासनालाही महसूल मिळेल”, अशी व्यवस्था केली जात असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Auto Driver Fight With Rapido Driver Viral Video
 पनवेलमध्ये रॅपिडोवर पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाला एका ऑटोचालकाने “काम करू देणार नाही” अशी धमकी दिली.

झोमॅटो-स्विगी बाईकवरही कारवाई होणार

शिवसेनेचे (ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी अन्नपदार्थ घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या दुचाकीस्वारांचाही प्रश्न उपस्थित केला. हे लोक बेदरकारपणे दुचाकी चालवत असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उत्तर देत असताना प्रताप सरनाईक यांनी भविष्यात या दुचाकीवरही आरटीओच्या माध्यमातून कारवाई होणार असल्याचे सांगितले.

राज्यात ओला, उबेर, रॅपिडो तसेच इतर काही ॲप्सच्या माध्यमातून शासनाची वैध परवानगी आणि परिवहन विभागाच्या नियमांचे पालन न करता अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा सुरू आहे. या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांमुळे प्रवाशांच्या आणि विशेषतः महिला, विद्यार्थी आणि अल्पवयीन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत धोका निर्माण होत आहे, असा प्रश्न मुंबईतील चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांनी उपस्थित केला होता.