सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाचा जगभरात लौकिक वाढत असताना आगामी लोकसभा विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा भाजपची सत्ता कायम राहण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात, प्रभागात तीन बचत गट, २५ तरूण, शासकीय योजनांचे ५० लाभार्थी आणि काँग्रेस व राष्ट्रवादीचे किमान २५ कार्यकर्ते भाजपमध्ये आणावेत. या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही काँग्रेसच्या अनामत रकमा जप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
अक्कलकोट तालुक्यात बावनकुळे यांनी भेट देऊन पक्षाच्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या दहिटणे गावातील शेतघरात झालेली टिफिन बैठक निमित्त होते. दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, पुण्याचे मुरलीधर मोहोळ, प्रा. चांगदेव कांबळे, शहाजु पवार, अक्कलकोटच्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष संजीव पाटील यांच्यासह पक्षाचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रभारी आणि पदाधिका-यांसोबत बावनकुळे यांनी ‘ टिफिन ‘ भोजन केले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मुक्तकंठाने प्रशंसा करीत बावनकुळे यांनी सुमारे ३६७ कोटी रूपये खर्चाचा अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा शासनाने मंजूर केला आहे. त्याचे शिल्पकार कल्याणशेट्टी आहेत, अशी प्रशस्ती जोडली
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.