अहमदनगर : अजित पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचा सूर्योदय झाला होता. परंतु आता अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्याने अनेकजण अस्वस्थ आहेत, कारण आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नसल्याने उर्वरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सूर्यास्त झालेला आहे, अस्त होत आलेला आहे. त्यातूनच राहिलेल्या राष्ट्रवादीमधून अजितदादांना डावलले जात असल्याची भाषा सुरू झाली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरमध्ये बोलताना केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आणखी १० आमदारांच्या प्रवेशाची यादी तयार आहे, असाही दावा केला. मात्र हे आमदार कोणत्या पक्षाचे आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 'महाविजय-२०२४' अभियाना अंतर्गत 'घरघर चलो' यात्रेची सुरुवात नगर शहरातून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डावलण्याचे काम होत असल्याचा आरोप केला होता, त्या संदर्भात आमदार बावनकुळे यांनी वरील प्रत्युत्तर दिले आहे. हेही वाचा : उपसभापतींच्या सुनावणीच्या अधिकारांवरून कायदेशीर पेच? अजित पवार हे कर्तृत्ववान नेते आहेत. त्यांना कधीच कोणी डावलू शकत नाही. परंतु महायुतीत ते सहभागी झाल्याने काहीजण अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच अशी वक्तव्य केली जात आहेत. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी मोठे स्थान निर्माण केले होते. आता ते वगळून राष्ट्रवादीमध्ये अंधःकार निर्माण झाला आहे, असाही आरोप बावनकुळे यांनी केला. आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष व भाजपचा 'बी प्लॅन' तयार आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, त्याची आवश्यकता नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निष्णात वकील आहेत. विधानसभेच्या परंपरा, पद्धती व निकालाचे पालन करून ते योग्य तो निर्णय घेतील. त्यामुळे बी प्लॅनची आवश्यकता नाही. सरकार इतके भक्कम आहे की २२५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारला काही अडचण नाही. याशिवाय रोज अनेकजण पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त करतात. १० आमदारांची यादी आजच तयार आहे, असे बावनकुळे म्हणाले. हेही वाचा : हवामान खात्याचे अंदाज का चुकतात? अत्याधुनिक यंत्रणा असूनही उपयोग… आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गट, राष्ट्रवादीमधील अजितदादा गट यांचे स्थान काय? या प्रश्नावर बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, आमची महायुती आहे. ही युती सन्मानजनक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 'एनडीए'मध्ये १३ घटक पक्ष आहेत, त्या सर्वांचा सन्मान ठेवला जाणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदी व उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधात भाष्य करतात, दुसरीकडे आता शरद पवार व अदानी यांची भेट झाली, यासंदर्भात बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले 'इंडिया' आघाडीची भूमिका रोज बदलत आहे. 'इंडिया'मधील उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदुधर्म हद्दपार करण्याची, संपवण्याची भाषा केली. त्याबद्दल राहुल गांधी यांची काय भूमिका आहे, हे प्रथम जाहीर करावे. काँग्रेसकडे कुठलाही मुद्दा नाही, ते केवळ संभ्रम निर्माण करत आहेत. काँग्रेसच्या रक्तातच कर्करोग आहे, राहुल गांधी यांनी आधी उदयनिधी यांच्या भूमिकेबद्दल उत्तर द्यावे. हेही वाचा : अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाचा पुण्यात साकारण्यात आला देखावा उद्धव ठाकरे यांनाही मी तीनदा प्रश्न विचारला, ज्या हिंदुत्वाचा मुद्दा ठाकरे उपस्थित करतात, तो हिंदू धर्म हद्दपार करण्याची भाषा 'इंडिया' आघाडीतील उदयनिधी यांनी केली, त्यांच्यासोबतच ठाकरे यांनी युती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरगरिबांचे नेते आहेत, कैवारी आहेत, हे राहुल गांधी यांनी लक्षात घ्यावे.