परभणी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दि.१० फेब्रुवारीपासून बारावी तर दि.२० फेब्रुवारी पासून दहावीच्या परिक्षा घेतल्या जाणार आहेत. जिल्हयात या परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी शिक्षण विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विद्यार्थ्यांकडून परिक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. परीक्षा केंद्रात गैरप्रकार आढळल्यास तत्परतेने कायदेशीर कार्यवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
परभणी जिल्हयात बारावीचे एकूण ६९ परिक्षा केंद्र असून २७ हजार २५० विद्यार्थी संख्या आहे. तर दहावीचे ९१ परिक्षा केंद्र असून विद्यार्थी संख्या २९ हजार ९११ आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सविता बिरगे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी व सर्व गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते.
गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्हयातील सर्व परिक्षा केंद्रांतील वर्ग खोल्यांमध्ये सीसी टिव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित केंद्रप्रमुखांना सीसी टिव्ही कॅमेरे लावण्याबाबत लेखी पत्राव्दारे कळवावे. ज्या परिक्षा केंद्रांवर सीसी टिव्ही कॅमेरे लावले नसल्याचे आढळल्यास याची गांभीर्याने दखल घेऊनअशा ठिकाणी शिक्षकांची अदलाबदल करण्यात यावी. तसेच त्या केंद्राची मान्यता रद्द करण्यातबाबत, शासनाला कळविले जाईल. परिक्षा काळात वीज लोडशेडींग असल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून बॅटरी किंवा इन्व्हर्टरची व्यवस्था करण्यात यावी. तसेच संवेदनशील केंद्रांच्या परिसरात गैरप्रकार टाळण्यासाठी व्हिडीओ शुटींगची सुविधा ठेवावी. भरारी पथक व बैठे पथकांनी विशेष दक्षता घ्यावी. अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ कार्यवाई करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत..
परिक्षा केंद्र परिसरात कलम १४४
परिक्षा केंद्रांच्या परिसरात फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येणार आहेत. या कलमान्वये परिक्षा केंद्राजवळच्या १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन/एसटीडी/भ्रमणध्वनी/आयएसडी/फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद राहतील. हा आदेश परिक्षार्थी, परिक्षेशी संबंधित अधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.

